






बेळगाव : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा जागर करण्यासाठी ‘जागर विवेकाचा – पुष्प ३९ वे’ या विशेष विचारसंवादाचे आयोजन शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आले आहे.
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने प्रगतिशील लेखक संघ, बेळगाव आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या विचारसंवादामध्ये महात्मा फुले यांच्या कार्याच्या विविध पैलूंवर तीन व्याख्याने होणार आहेत. यामध्ये ‘महात्मा फुले यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य’ या विषयावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनिल आजगावकर, ‘महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य’ या विषयावर प्रगतिशील लेखक संघाचे उपाध्यक्ष मधु पाटील, तर ‘महात्मा फुले यांचे स्त्रीविषयक धोरण’ या विषयावर न्यू इंग्लिश स्कूल , मुतगेचे शिक्षक शिवाजी हसनेकर विचार मांडणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक एस. आर. पाटील असणार आहेत.
महात्मा फुले यांनी शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक परिवर्तन आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेले कार्य आजही समाजाला दिशादर्शक आहे. त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता आणि सामाजिक परिवर्तनातील योगदान यावर या विचारसंवादातून प्रकाश टाकण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम शहीद भगतसिंग सभागृह, गिरीश कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली, बेळगाव येथे होणार असून मराठी रसिक, साहित्यिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रगतिशील लेखक संघाचे कार्याध्यक्ष शंकर चिगुळे, सचिव ज्योतिबा अगसिमनी, अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे आणि सचिव कृष्णा शहापूरकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta