






बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता मराठी विद्यानिकेतन, ज्योती कॉलेज कॅम्पस, कॅम्प, बेळगाव येथे ‘शब्दांच्या पाऊलखुणा’ या विशेष काव्यात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात कवी गुरुनाथ किरमटे यांच्या स्वरचित कवितांचे सादरीकरण होणार असून, त्यानंतर उपस्थित कवींचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
कवी गुरुनाथ मनोहर किरमटे हे बेळगावमधील कवी, साहित्यप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. जी. जी. टी. आय. कॉम्प्युटर एज्युकेशनचे संस्थापक म्हणून ते गेली २२ वर्षे संगणक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आजवर सुमारे १५० कविता आणि २०० चारोळ्यांचे लेखन केले आहे. बेळगाव परिसरातील विविध साहित्य संमेलनांमध्ये निमंत्रित कवी म्हणून त्यांचा सहभाग असतो. एप्रिल २०२५ मध्ये सह्याद्री प्रतिष्ठान व सैनिक वेल्फेअर असोसिएशन, कोल्हापूर यांच्या वतीने त्यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आजवर सुमारे आठ हजार पुस्तके विविध शाळा व विद्यार्थ्यांना भेट दिली आहेत. त्यांचा पहिला कवितासंग्रह लवकरच प्रकाशित होत आहे.
शब्दांच्या माध्यमातून भावना व्यक्त करणाऱ्या आणि आपल्या कवितांतून जीवनानुभव मांडणाऱ्या कवीच्या साहित्यिक प्रवासाचा परिचय करून देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी राहणार आहेत. संस्थेचे सचिव श्री. सुधाकर गावडे यांनी सर्व साहित्यप्रेमी, कवी आणि रसिकांनी या कार्यक्रमास सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta