






इन्स्टाग्रामवरील जाहिरातीला भुलून १.९१ लाखांची फसवणूक; हॉटेल रिव्ह्यू टास्कच्या नावाखाली सायबर भामट्यांचा डाव
बेळगाव : घरबसल्या काम करून भरघोस कमाई करण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी रामदुर्ग तालुक्यातील एका ३४ वर्षीय महिलेला आर्थिक गंडा घातला आहे. इन्स्टाग्रामवरील ‘वर्क फ्रॉम होम’च्या जाहिरातीला प्रतिसाद देणे महिलेला चांगलेच महागात पडले असून, या फसवणुकीत तब्बल १ लाख ९१ हजार रुपयांची रक्कम अडकली आहे. याप्रकरणी जिल्हा सायबर क्राईम विभागात अज्ञातांविरुद्ध मंगळवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
तनुजा (वय ३४) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. इन्स्टाग्राम पाहत असताना त्यांना घरबसल्या काम करून पैसे कमावण्याची संधी असल्याची जाहिरात दिसली. या जाहिरातीला भुलून त्यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर त्यांचा ‘मेगा कॉर्प’ नावाच्या ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला. या ग्रुपमधील सदस्यांनी गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांना हॉटेल रिव्ह्यू करण्याचे टास्क दिले.
सुरुवातीला टास्क पूर्ण करण्यास सांगून त्यानंतर विविध लिंकच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. १ व २ नोव्हेंबर २०२६ या दोन दिवसांत तनुजा यांनी टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख ९६ हजार ८०० रुपये गुंतवले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना ४ हजार ९३५ रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, उर्वरित रक्कम आणि लाभांश काढण्याची वेळ येताच आणखी एक लाख रुपये जमा करण्याची अट घालण्यात आली.
पैसे काढण्यासाठी पुन्हा पैसे भरण्याची मागणी झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे तनुजा यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने जिल्हा सायबर क्राईम विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदविली. या प्रकरणी अज्ञात सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta