Sunday , November 22 2026
Breaking News

बसवण्णांच्या अवमानप्रकरणी लेखक रवी हंजी यांच्याविरोधात बेळगावात भव्य आंदोलन

Spread the love

 

लेखकासह खासगी वृत्तपत्राच्या संपादकावर कारवाईची मागणी; एसआयटीमार्फत चौकशी करण्याची आंदोलकांची मागणी

बेळगाव : विश्वगुरू बसवण्णा यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा तसेच ‘बसव मंडप’ या पुस्तकातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला धक्का पोहोचविणारे आक्षेपार्ह लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप करीत लेखक रवी हंजी यांच्याविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक लिंगायत महासभेच्या वतीने शुक्रवारी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आले.

नागनूर रुद्राक्षी मठाचे पीठाधिपती अल्लमप्रभू स्वामीजी आणि अथणी मोटगी मठाचे प्रभुचन्नबसव स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी लेखक रवी हंजी आणि संबंधित खासगी वृत्तपत्राच्या संपादकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी बोलताना अल्लमप्रभू स्वामीजी म्हणाले की, बसवण्णांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाला धक्का पोहोचविण्याचे प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. समाजस्वास्थ्य बिघडविणाऱ्या अशा कृत्यांविरोधात सरकारने कठोर कायदेशीर कारवाई करून दोषींना शिक्षा द्यावी.

पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील बसवण्णांच्या विचारांचा आदर करतात. अशा महान समाजसुधारकांविषयी आक्षेपार्ह लिखाण प्रसिद्ध करणे निषेधार्ह आहे. सरकारने वादग्रस्त पुस्तक जप्त केले असून, त्याच्या विक्रीसह प्रसारावरही पूर्णपणे बंदी घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

प्रभुचन्नबसव स्वामीजी यांनीही या प्रकरणातील आरोपी रवी हंजी जगाच्या कोणत्याही भागात असले तरी त्यांना अटक करून राज्यात आणावे, अशी मागणी केली. आरोपीची सुटका झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यासह न्यायालयीन लढाही उभारण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

या प्रकरणात केवळ एफआयआर दाखल करून चालणार नाही. यामागे मोठे षड्यंत्र असल्याचा संशय व्यक्त करीत लेखकासह संबंधित वृत्तपत्राच्या संपादकाची भूमिकाही तपासली जावी. संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

बसवण्णांचा सन्मान आणि त्यांच्या विचारधारेचे रक्षण करण्यासाठी लढा सुरूच राहील. सरकारने तातडीने कठोर कारवाई न केल्यास आगामी काळात राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *