





जिल्ह्यातील ५.९ लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ५ हजार रुपये; मदत थेट खात्यावर जमा होणार
बेळगाव : दुष्काळाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. पीक नुकसान भरपाईपोटी सरकारने २९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरित केला असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ५.९ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ही माहिती दिली.
बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सुमारे ५.३ लाख हेक्टर क्षेत्र दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रातील बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे जमा केली जाणार असून, यामध्ये कोणत्याही मध्यस्थाची भूमिका राहणार नाही.
पहिल्या टप्प्यातील मदतीनंतर दुसऱ्या टप्प्यात पिकांच्या प्रकारानुसार नुकसान भरपाईचे वितरण केले जाणार आहे. यासाठी पिकांचे पावसावर अवलंबून असलेली पिके, सिंचनाखालील पिके आणि बहुवार्षिक पिके अशा तीन गटांत वर्गीकरण करण्यात येणार आहे. या वर्गवारीनुसार शासनाच्या निकषांप्रमाणे प्रतिहेक्टरी ११ हजार आणि २२ हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
दरम्यान, पीक वर्गीकरण आणि नुकसान भरपाईच्या नियमांबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावपातळीवर शेतकऱ्यांना माहिती दिली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील पाच हजार रुपयांच्या मदतीनंतर पिकांच्या प्रकारानुसार पुढील नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाकडून टप्प्याटप्प्याने मदत वितरित केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.
Belgaum Varta Belgaum Varta