






बेळगाव : बेळगाव विभागातून २०२६ सालचा प्रतिष्ठित ‘सहकार रत्न’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते दिगंबर एस. पवार यांचा चव्हाट गल्लीतील नागरिकांच्या वतीने गुरुवारी (दि. १९ नोव्हेंबर) भव्य नागरी सत्कार करण्यात आला. चव्हाट गल्ली येथील श्री जालगार मारुती मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गल्लीतील ज्येष्ठ पंच बाबुराव लक्ष्मणराव मोहिते होते. व्यासपीठावर माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, मराठा बँकेचे चेअरमन शेखर हंडे, व्हाईस चेअरमन विनोद हंगिरकर, मल्लेश चौगुले, माजी नगरसेवक पुंडलिक परीट, बँकेचे संचालक मोहन चौगुले, विश्वजीत हसबे यांच्यासह गल्लीतील ज्येष्ठ पंचमंडळी उपस्थित होती.
प्रारंभी विश्वजीत हसबे यांनी प्रास्ताविक केले. शेखर हंडे यांनी दिगंबर पवार यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. मालोजीराव अष्टेकर यांनी चव्हाट गल्लीच्या शेकडो वर्षांच्या शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील परंपरेचा आढावा घेत बेळगावच्या विकासात गल्लीचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. तर मल्लेश चौगुले यांनी चव्हाट गल्ली आणि बहुजन समाजातील जिव्हाळ्याच्या संबंधांचा उल्लेख केला.
यानंतर दिगंबर पवार व त्यांच्या पत्नी सुवर्णा पवार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि भगवा फेटा देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना पवार यांनी सहकार क्षेत्रातील आपल्या प्रवासातील आठवणींना उजाळा दिला. हा पुरस्कार आपल्याला सहकार्य करणाऱ्या असंख्य व्यक्तींना समर्पित असल्याचे सांगून समाज, बेळगाव शहर आणि विविध संस्थांच्या प्रगतीसाठी यापुढेही कार्यरत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी औद्योगिक क्षेत्रात राज्यस्तरीय नियुक्ती झाल्याबद्दल मल्लेश चौगुले यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मराठा बँकेचे चेअरमन शेखर हंडे आणि व्हाईस चेअरमन विनोद हंगिर्गेकर यांचा गल्लीच्या वतीने गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात बेळगावचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ, श्री ज्योतिबा देवस्थान, श्री देव दादा सासनकाठी, सिद्धकला भजनी मंडळ, शिवशंभू ढोल पथक, श्री चव्हाटा युवक संघटना, मोरया ग्रुप, क्रांतिवीर रिक्षा स्टँड मित्रपरिवार, कल्याण चौक गणेश मंदिर संघटना, समस्त पवार कुटुंब, मराठा बँकेचे संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग आणि मित्रपरिवाराच्या वतीनेही पवार यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
शेवटी श्री ज्योतिर्लिंग भक्त मंडळाचे खजिनदार प्राचार्य आनंद आपटेकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta