Sunday , November 22 2026
Breaking News

तुळशी विवाहाची लगबग सुरू!; बेळगावच्या बाजारपेठा पूजेच्या साहित्याने सजल्या : तुळशी वृंदावनांच्या खरेदीलाही पसंती

Spread the love

 

“ऊसाचे मंडप सजवूया आपण,
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,
सामील होऊया आनंदोत्सवात,
तुळशी विवाह साजरा करूया थाटात!”

हिंदू धर्मातील महत्त्वाच्या धार्मिक परंपरांपैकी एक असलेल्या तुळशी विवाह सोहळ्याची लगबग आता सुरू झाली आहे. यंदा शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशीपासून तुळशी विवाह सोहळ्याला प्रारंभ होणार असून, मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा मंगल सोहळा पार पडणार आहे.

तुळशी विवाहाच्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या बाजारपेठा पूजेच्या साहित्याने सजल्या आहेत. सणासुदीच्या उत्साहाने बाजारपेठांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून, तुळशी विवाहासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांची दुकाने ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

घरोघरी तुळशी वृंदावनाची स्वच्छता आणि रंगरंगोटी करण्याच्या कामाला वेग आला आहे. त्याचबरोबर बाजारपेठेत विविध आकारांतील आणि आकर्षक रंगसंगतीतील तुळशी वृंदावने विक्रीसाठी दाखल झाली आहेत. ५०० रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत या वृंदावनांचे दर असून, ग्राहकांकडून त्यांना पसंती मिळत आहे.

तुळशी विवाहाला हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व आहे. भगवान विष्णू आणि तुळशीचा विवाह लावण्याची परंपरा या दिवशी पार पाडली जाते. तुळशी विवाहानंतर विवाह सोहळ्यांच्या मुहूर्तांना प्रारंभ होत असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

बेळगाव शहरासह परिसरातील ग्रामीण भागातही तुळशी विवाह मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. यासाठी आवळा, चिंच, बोर, हळदी-कुंकू, फुले, हार, नारळ तसेच अन्य पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे.

तुळशी वृंदावनाभोवती आकर्षक रांगोळी काढून उसाचा मंडप उभारला जातो. त्यानंतर तुळशी आणि भगवान श्रीकृष्णाची विधिवत पूजा करून विवाह सोहळा पार पाडला जातो. मंगलाष्टकांच्या गजरात भटजींच्या पौरोहित्याखाली विवाहाचे विधी केले जातात. अखेरीस आरती करून गोडधोड पक्वान्नांचा नैवेद्य दाखविला जातो. अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात तुळशी विवाह सोहळा साजरा करण्यासाठी सध्या सर्वत्र तयारी सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *