






दिवसा उन्हाचा चटका, रात्री बोचरी थंडी
बेळगाव : ‘गरिबांचे महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव शहर आणि तालुका परिसरात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. किमान तापमानाचा पारा घसरून शनिवारी 9.8 अंश सेल्सिअसवर पोहोचला. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी बोचऱ्या थंडीचा अनुभव नागरिकांना येत आहे. दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री थंडीचा जोर अशा संमिश्र वातावरणाने बेळगावकरांना हुडहुडी भरली आहे.
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून बेळगाव परिसरात थंडीला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट होत असून शुक्रवारी 12 अंश सेल्सिअस असलेले तापमान शनिवारी थेट 9.8 अंशांवर आले. यंदाच्या हंगामात तापमानाचा पारा प्रथमच इतका खाली आल्याने थंडीचा प्रभाव अधिक तीव्र झाला आहे. दुसरीकडे, दिवसा कमाल तापमान 26 ते 28 अंशांच्या दरम्यान राहत असल्याने उन्हाचा चटकाही जाणवत आहे.
सायंकाळी सहानंतर वातावरणात गारवा वाढण्यास सुरुवात होते. रात्री सातनंतर थंडीचा जोर अधिकच जाणवत असून पहाटे शहर आणि परिसरात धुक्याची चादर पसरत आहे. बोचऱ्या थंडीमुळे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्याही कमी होत असल्याचे चित्र आहे.
थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरातील रस्त्यांच्या कडेला तसेच ग्रामीण भागातील मोकळ्या जागांवर शेकोट्या पेटविल्या जात आहेत. विशेषतः ग्रामीण भागात शहराच्या तुलनेत थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. तापमानातील चढ-उतार आणि दिवसा-रात्रीच्या वातावरणातील तफावतीमुळे सर्दी, पडसे यांसारख्या हंगामी आजारांचे प्रमाणही वाढू लागले आहे.
दरम्यान, थंडीचा जोर वाढल्याने बाजारपेठेत स्वेटर, जॅकेट आणि शालींची मागणी वाढत आहे. एकीकडे दिवसा उन्हाचा सामना करावा लागत असताना रात्री मात्र उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे बेळगावकर सध्या गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta