






सीमा प्रश्नात बदल शक्य नसल्याचा पुनरुच्चार; कर्नाटकची भूमिका कायम असल्याचे स्पष्ट
बेळगाव : बेळगाव-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकारची भूमिका बदललेली नसून, कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी पुन्हा एकदा महाजन अहवालाचाच आधार घेतला आहे. महाजन अहवाल अंतिम असून, सीमा प्रश्नात कोणत्याही प्रकारचा बदल करणे शक्य नसल्याचे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
राज्यातील जमीन, पाणी आणि भाषेच्या हक्कांसंदर्भात बोलताना पाटील यांनी कर्नाटकची भूमिका स्पष्ट केली. महाजन अहवाल किंवा जैसे थे स्थिती हाच कन्नडिगांचा अंतिम निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सीमाभागातील कन्नड भाषिकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले. जलवाटपाच्या प्रश्नात कर्नाटकवर अन्याय होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी याविरोधात जागरूक राहून संघर्ष सुरू ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, आगामी सुवर्णसौध अधिवेशन केवळ आंदोलने आणि निदर्शनांपुरते मर्यादित न राहता उत्तर कर्नाटकासह संपूर्ण राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून ठोस उपाययोजना करणारे ठरावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कन्नड भाषेला दुय्यम वागणूक मिळत असल्याच्या मुद्द्यावर सुवर्णसौधमध्ये आमदारांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्याची मागणीही त्यांनी केली. याशिवाय सुवर्णसौध परिसरात नाडदेवी भुवनेश्वरीची मूर्ती उभारण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
बासवण्णा यांच्याविषयीच्या वादग्रस्त पुस्तकावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. बासवण्णा यांना सरकारने सांस्कृतिक नायक म्हणून घोषित केले असून, त्यांचे तत्त्वज्ञान आणि अनुभव मंटपाचा संदेश संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
एकीकडे सीमाप्रश्नावर महाराष्ट्राची भूमिका आणि सीमाभागातील मराठी भाषिकांची मागणी कायम असताना, एच. के. पाटील यांनी महाजन अहवालाचाच पुनरुच्चार केल्याने सीमाप्रश्नावरील कर्नाटक सरकारची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta