






बेळगाव : कार्तिक पौर्णिमेनिमित्त बेळगाव येथील श्री कपिलेश्वर मंदिरात कार्तिक स्वामी दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्तररात्री २ वाजून १५ मिनिटांनी दर्शनाला प्रारंभ होणार असून, मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजून २३ मिनिटांपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्र असताना श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते. या विशेष दिवशी श्री कार्तिक स्वामींचा अभिषेक करण्यात येणार असून, सर्व भाविकांना दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विशेषतः महिलांसाठी हा दर्शन सोहळा महत्त्वाचा मानला जातो. श्री कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग वर्षातून केवळ एकदाच येत असल्याने महिला भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मंगळवारी रात्री ८ वाजून २३ मिनिटांनी विशेष महाआरती करण्यात येणार असून, त्यानंतर कार्तिक स्वामी मंदिर बंद करण्यात येईल. त्यामुळे सर्व भाविकांनी दर्शनाच्या वेळेची नोंद घेऊन वेळेत उपस्थित राहावे.
या पवित्र दर्शन सोहळ्याला सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे निमंत्रण श्री कपिलेश्वर महादेव ट्रस्टच्या वतीने देण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta