





बेंगळुरू विभागीय स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई; मध्य प्रदेशात राष्ट्रीय स्तरावर चमक दाखविण्याची संधी
बेळगाव : मध्य प्रदेशातील देवास येथे २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ३७ व्या विद्याभारती राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा विद्याभारतीचे कराटेपटू रवाना झाले आहेत.
देवास येथील सरस्वती विद्यामंदिर विद्यालय, मुखर्जी नगर येथे ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा शाळेचा खेळाडू आदित्य सोनार, तसेच देवेंद्र जीनगौडा शाळेचे पृथ्वी नुली आणि रतन पाटील यांची निवड झाली आहे. प्रशिक्षक हरीश सोनार आणि कृष्णा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
नुकत्याच बेंगळुरू येथे झालेल्या क्रांती व क्षेत्रीय कराटे स्पर्धेत या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदकांची कमाई केली होती. याच कामगिरीच्या जोरावर त्यांना राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
या खेळाडूंना विद्याभारतीचे राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील आणि राज्य सहसचिव सुजाता दप्तरदार यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभत आहे.
राष्ट्रीय स्पर्धेतही बेळगावचे खेळाडू पदकांची कमाई करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
Belgaum Varta Belgaum Varta