






सुवर्णपदक विजेती समिधा बिरजेचा रयत गल्लीवासीयांतर्फे भव्य सत्कार
बेळगाव : कुस्ती क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात. बेळगावचे अनेक गुणवान खेळाडू कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. अशा गुणवंत खेळाडूंच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रोत्साहन देणे हे समाजाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन मराठा समाजाचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी केले.
बेंगळूर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत ४० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविणाऱ्या वडगाव येथील रयत गल्लीची कुस्तीपटू समिधा भोमेश बिरजे हिच्या यशाबद्दल नागरिकांच्यावतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. रयत गल्लीतील शाळेत झालेल्या या कार्यक्रमात रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते समिधाचा फेटा बांधून शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तिचे कुस्ती प्रशिक्षक मारुती घाडी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना कोंडुसकर यांनी तरुण पिढीने व्यायामाची आवड जोपासण्याचे आवाहन केले. व्यायाम आणि खेळामुळे तरुणांना वाईट व्यसनांपासून दूर राहण्यास मदत होते. त्यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या यशाचे कौतुक करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
गोपाळ बिरजे यांनी सत्कारामुळे खेळाडूंना भविष्यात आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते, असे सांगितले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उज्ज्वल भवितव्य घडविता येते, असेही त्यांनी नमूद केले. विलास घाडी यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी समिधाचे वडील भोमेश बिरजे तसेच कुस्ती स्पर्धेतील अन्य विजेती मनस्वी जायणाचे हिचे वडील यल्लाप्पा जायणाचे यांचाही सन्मान करण्यात आला. रयत गल्ली बाल भजनी मंडळ, वारकरी महिला संघ, महिला मंडळ, दिगंबर तारीहाळकर, चांगुणा धुमाळे, श्रीधर खन्नुकर आदींनी समिधाला पुष्पगुच्छ व रोख पारितोषिक देऊन गौरविले.
कार्यक्रमाला मराठा समाज सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष गोपाळ बिरजे, ज्येष्ठ पंच नारायण माळवी, शेतकरी नेते राजू मर्वे, निवृत्त क्रीडा संयोजक विलास घाडी, आनंदा बिरजे, विलास बिरजे आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीकांत काकतीकर यांनी स्वागत केले, तर संदीप खन्नुकर यांनी आभार मानले. समिधाचे अभिनंदन करण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta