






महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे जिल्हाशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : कर्नाटकात सध्या जंबो शिक्षक भरती होत आहे, पण मराठी माध्यमाच्या शिक्षकांच्या एकूण ४९२ जागा रिक्त असून देखील पहिल्या टप्प्यात एकही जागा मराठी माध्यमासाठी देण्यात आली नव्हती. त्यानंतर मराठी भाषिकांनी विविध जिल्ह्यांमधून निवेदने देऊन यासाठी आवाज उठविला. त्यानंतर सरकारने २०० जागा भरण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात फक्त ७८ जागांसाठीच अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यापैकी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याच्या वाट्याला फक्त ३९ जागा आल्या आहेत. त्यामुळे मराठी शिक्षकांवर आणि शाळांवर होणारा अन्याय दूर करावा आणि आश्वासनाप्रमाणे किमान २०० जागा भरण्यात याव्यात, यासाठी आज जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती लीलावती हिरेमठ यांच्या माध्यमातून कर्नाटकचे शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांच्या नावे निवेदन देण्यात आले.
यावेळी समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी तातडीने हा प्रश्न वरिष्ठांकडे पाठविला जाईल, तसेच त्याचा पाठपुरावा करू आणि मराठीच्या जागा वाढवून घेऊ, असे आश्वासन दिले.
यावेळी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, समिती नेते ॲड. अमर येळूरकर, आर. एम. चौगुले, माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री, युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, सूर्याजी रावजी पाटील, संतोष कृष्णाचे, सुरज कुडूचकर, किरण मोदगेकर, किसन सुंठकर, आकाश भेकणे, प्रवीण कोराने आदी उपस्थित होते.
जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कर्नाटकचे शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांना खालील आशयाचे निवेदन पाठविण्यात आले :
निवेदनात असें नमूद आहे की, कर्नाटक राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती होत आहे. या भरतीच्या सुरुवातीच्या जाहिरातीत (जी.आर.) मराठी व उर्दू माध्यमाला स्थान देण्यात आले नव्हते.
त्यानंतर विविध संघ-संस्था, विद्यार्थी आणि उमेदवारांनी मराठी व उर्दू माध्यमातूनही शिक्षक भरती करावी, यासाठी आंदोलने केली आणि निवेदने दिली. त्याची दखल घेऊन सरकारकडून उर्दूसाठी ८०० आणि मराठीसाठी २०० जागा भरण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले.
मात्र, प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू झाल्यावर ठरल्याप्रमाणे जागा भरण्यात येत नसून, पुन्हा एकदा मराठी भाषिक शिक्षकांवर अन्याय करण्यात येत आहे. जाहीर केलेल्या २०० जागांऐवजी केवळ ७८ जागांसाठीच अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामध्ये बेळगाव जिल्हा – ३९ जागा, चिकोडी जिल्हा – २६ जागा आणि बिदर जिल्हा – १३ जागा, असे वाटप करण्यात आले आहे.
सरकारी आकडेवारीनुसार कर्नाटकातील मराठी माध्यम शाळांमध्ये ४९२ शिक्षकांची आवश्यकता असताना, २०० जागा देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. ते आश्वासनही पाळले जात नसून, केवळ ७८ जागा देऊन मराठी भाषिकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा मराठी भाषिक शिक्षक, शाळा आणि विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.
तरी आपण याकडे तातडीने लक्ष देऊन, आश्वासनानुसार मराठी माध्यमाच्या २०० जागा तातडीने भरण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा मराठी भाषिकांना तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta