Sunday , July 26 2026
Breaking News

महिला व मुलींना संरक्षण द्या : जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

Spread the love

बेळगाव : महिलांवर अत्याचार करणार्‍यांना कडक शासन करण्याबरोबरच बेळगाव शहर परिसरात विविध गुन्ह्यांसह महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या असल्यामुळे प्रशासनाने प्रामुख्याने महिला व मुलींच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा. त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी मानवाधिकार लोककल्याण व भ्रष्टाचार विरोधी समितीने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
मानवाधिकार लोककल्याण व भ्रष्टाचार विरोधी समितीचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष नियाज मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आले. आमची समिती महिलांवरील अत्याचार व शोषणाविरोधात कार्य करत आहे.
कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचारास आळा घालण्यास आम्ही सक्षम आहोत. कोणताही भेदभाव न करता गेल्या 18 वर्षांपासून आम्ही सर्व जाती-धर्माच्या लोकांना स्वतःबरोबर घेऊन बेळगावात कार्यरत आहोत.
आमची मागणी आहे की दिल्ली प्रशासनाने राबिया सफी खून प्रकरणाची चौकशी सीबीआयद्वारे करून आरोपीला शोधून काढावे व त्याला कडक शासन करावे. त्याचप्रमाणे खंजर गल्ली येथील रहिवासी असलेल्या मुस्कान नांवाच्या मुलीचा हुंड्यासाठी छळ झाल्यामुळे मृत्यू झाला. तिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या दोषींना कठोर शासन केले जावे. हैदराबाद येथे देखील चैत्रा नांवाच्या 6 महिन्याच्या बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिचा खून करण्यात आला.
समाजात घडणार्‍या या घटना अत्यंत निंदनीय आहेत. तेंव्हा प्रशासनाने महिला व मुलींच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा. त्यांना संरक्षण द्यावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी नियाज मुल्ला, विजय सांबरेकर, जुबेदाबी के. पठाण, अरुण सालगुडे, आय. एम. कोतवाल, समीना पिरजादे, जुनेद कोतवाल, अबू अरब रहिमा काद्री, ए. एम. संदी, साहेब लाल किल्लेदार, राहुल डोंग्रे, मुबारक काजी, अबूशेमा काद्री आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *