बेळगाव : केंद्रीय विद्युत अनुसंधान, नवी दिल्ली, भारत सरकार आयोजित वीज वाचवा पर्यावरण वाचवा या राष्ट्रीय स्तरावरील भिंतीचित्र स्पर्धेमध्ये बेळगाव येथील एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलमधील दहावीमध्ये शिकत असलेल्या कु. दत्तगुरु सुभाष धुरी याने कर्नाटकात प्रथम व राष्ट्रीय स्तरावर चौथा क्रमांक पटकाविला. ही स्पर्धा दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली. दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे सन्माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग तसेच केंद्रीय उद्योग मंत्री श्री. कृष्णन पॉल उपस्थित होते. ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांच्या हस्ते दत्तगुरुला बक्षीस देण्यात आले.
कर्नाटकातील शालेय स्तरावर एकूण 60 हजार चित्रांमधून 50 चित्रे निवडण्यात आली त्यामधील फक्त एक चित्र दत्तगुरूचे होते.
राष्ट्रीय स्तरावर एकूण 108 स्पर्धक होते. त्यातून कु. दत्तगुरू याचा चौथा क्रमांक आला व त्याने कर्नाटकाचे व बेळगावच्या एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलचे नाव झळकाविले. दत्तगुरुला त्याचे पालक, शाळेचे प्राचार्य श्री. सुनील कुसाणे, उपप्राचार्य श्री. अरुण पाटील, शिक्षक वर्ग तसेच चित्रकला शिक्षक श्री. प्रफुल नाकाडी व श्री. सुहास काकतकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सीपीआरआयचे नोडल ऑफिसर श्री. एम. जी. आनंदकुमार व श्री. सूर्यनारायण कैलासम यांचे प्रोत्साहन मिळाले. सर्व स्तरातून कु. दत्तगुरु धुरी याचे कौतुक व अभिनंदन होत आहे.