डॉ. संतोष देसाई, मराठा संस्कृतीच्या रक्तदान शिबीरास प्रतिसाद
बेळगाव : माणसाने पुण्य प्राप्त करण्यासाठी काशी, रामेश्वरला जाण्याची गरज नाही. रक्तदान हे महादान आहे. यासाठी रक्तदान करणारी व्यक्तीच खरे पुण्य प्राप्त करते, असे प्रतिपादन डॉ. संतोष बी. देसाई यांनी केले. येथील मराठा संस्कृती संवर्धन संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कपिलेश्वर रोड येथील सेवक शॉपीच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब कदम-पाटील होते. डॉ. संतोष देसाई, डॉ. संचिता देसाई, बृहन महाराष्ट्र, कर्नाटकचे अध्यक्ष नितीन कपिलेश्वरी, केएलई ब्लड बँकेचे विठ्ठल माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन करून डॉ. संतोष देसाई म्हणाले, रक्तदान हेच खरे जीवनदान आहे. निरोगी व्यक्तीद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णांचे जीवन वाचविण्यासाठी होतो. त्यामुळेच रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते. 18 ते 65 वर्षापर्यंतच्या निरोगी व्यक्तींनी रक्तदान करून खरे पुण्य मिळवावे असे त्यांनी आवाहन केले. शिबिरात त्यांनी स्वतःही रक्तदान करून युवकांना एक आदर्श घालून दिला.
डॉ. संचिता देसाई यांनीही रक्तदानाचे महत्त्व सांगून दातांचे आरोग्य कसे राखावे याविषयीची सविस्तर माहिती दिली. नितीन कपिलेश्वरी यांनीही रक्तदानाचे महत्व विषद केले.
अध्यापिका श्वेता देसाई यांनी प्रास्ताविक करून मराठा संस्कृती संवर्धन संघटनेच्या कार्याची माहिती दिली. अध्यक्ष आबासाहेब कदंब-पाटील, संघटनेचे सरचिटणीस किशोर देसाई, युवा संघटनेचे अध्यक्ष शिवराज चव्हाण-पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर नितीन कपिलेश्वर यांनी जिजामाता व डॉ. संतोष देसाई यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर रक्तदानाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली.
श्वेता देसाई यांनी सूत्रसंचालन केले. सुजय शिंदे पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव देसाई, बी. बी. देसाई. संघटनेचे सभासद व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच केएलई ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ही विशेष परिश्रम घेतले.