बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे दिनांक 11 जानेवारी ते 13 जानेवारी या तीन दिवसांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. या कार्यक्रमाला अनुक्रमे डाॅ. नम्रता मिसाळे, प्रा.हर्षदा सुंठणकर, श्री.राजकुमार पाटील सर हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले.
शाळेमध्ये दोन वर्षानंतर हे स्नेहसंमेलन संपन्न झाले.शाळा मुलांमध्ये पेरत असलेले विचार मुलांच्या विविध गुणदर्शनातून दिसावेत, मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा,नाट्य-कला-संगीत यांचे अविष्काराच्या माध्यमातून तुषार बाहेर यावेत हाच उद्देश स्नेहसंमेलनाचा होता.
दिनांक 11 जानेवारीला डाॅ.नम्रता मिसाळे यांनी बालवाडीपासून ते दुसरीपर्यंतच्या पालकांना मार्गदर्शन केले. या वयातील मुलांच्या विकासासाठी समतोल आहार कसा असावा? मोबाईल, टी.व्ही यांच्या स्क्रीनमुळे मुलांच्या शारिरीक व मानसिक स्वास्थ्यामध्ये होणारे बदल याविषयावर मार्गदर्शन केले.
दिनांक 12 जानेवारी रोजी प्रा.हर्षदा सुंठणकर यांनी तिसरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले. या टप्प्यासाठी “वाचनाचे महत्व” (मग ते काहीही असो)या विषयावर विचार मांडले. या काळात गोष्टी, कथा वाचण्याचा सल्ला दिला.
दिनांक 13 जानेवारी रोजी श्री. राजकुमार पाटील सर यांनी सातवी ते दहावीपर्यंतच्या पालकांना मार्गदर्शन केले.ते म्हणाले “मुलांना कोणते क्षेत्र आवडते? त्याचाच शोध घेऊन त्यासाठी काय करावे लागेल? ते शोधा आणि झेप घ्या.पालकांनी आपली स्वप्ने मुलांवर लादू नयेत.”
या स्नेहसंमेलन दरम्यान वर्गवार गुणवंत विद्यार्थी, संगीत, नृत्य, खेळ,कला या बाबतीत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते कौतुक सोहळा पार पडला. विशेष म्हणजे इयत्ता दहावीच्या प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना विविध प्रोत्साहनात्मक बक्षिसे,हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना शाळेच्या हितचिंतकांकडून मिळणाऱ्या स्कॉलरशिपचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप झाले.
आय.आर.एस. अधिकारी श्री. आकाश चौगुले सर यांच्या बढतीनिमित्त त्यांचा सत्कार करून पालकांसमोर आदर्श ठेवला.
‘किल्ल्यातील चेटकीण ‘ एकांकिकेतील विद्यार्थ्यांचा ‘आंतरराज्य एकांकिका स्पर्धेत ‘ सहभाग घेऊन तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. दिग्दर्शिका डाॅ.संजीवनी खंडागळे यांचाही गौरव करण्यात आला. यानंतर सर्व बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते कोळीनृत्य, प्रबोधनात्मक गीते, गुरूवंदना, नाटके, एकांकिका, विनोदी चुटके अशा विविधांगी विषयावर विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडले. यातून मुलांची आवड, निवड आणि आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. संगीत विभागाने उत्तम गाणी सादर केली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉ. नम्रता मिसाळे, प्रा. हर्षदा सुंठणकर, श्री.राजकुमार पाटील सर, आय.आर.एस.अधिकारी श्री.आकाश चौगुले, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव श्री.विक्रम पाटील सर, सदस्य श्री. आर. के. पाटील, श्री. आनंद पाटील, अध्यक्ष श्री.सुभाषराव ओऊळकर सर, उपाध्यक्ष आनंदराव जाधव सर, मुख्याध्यापक श्री.नारायण उडकेकर सर, श्री.जी.व्ही. सावंत, शिक्षण समन्वयक निलुताई, बालमंदीर विभागप्रमुख सौ.सीमाताई, विद्यार्थी प्रतिनिधी कु.अवधूत देवळी, कु.मनाली बराटे, कु.शीतल पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती प्रतिभा मसूरकर, श्रीमती रूपाली हळदणकर, श्रीमती शैला आडाव यांनी केले.