बेळगाव : मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारा ‘हम दो हमारे बारा’ हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शित होऊ देणार नाही, असा पवित्रा घेत आज बेळगावमधील एसडीपीआय संघटनांकडून आंदोलन करण्यात आले.
राणी कित्तूर चन्नम्मा चौकात मुस्लिम समाजातील विविध संघटनांच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले होते. ७ जून रोजी ‘हम दो हमारे बारा’ हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्यात आल्या असून या विरोधात आज एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या चित्रपटात इस्लाम धर्माविषयी चुकीची माहिती पसरवून समाजात द्वेष निर्माण होईल असे प्रसंग दाखविण्यात आले आहेत. कुराणातील श्लोक चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आले आहेत. शिवाय इस्लाम हा असहिष्णु धर्म असल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटामुळे समाजातील एकोपा बिघडण्याची शक्यता आहे, मुस्लिम समाजाविरुद्ध हिंसाचार भडकण्याचीही शक्यता आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
यासंदर्भात एसडीपीआय नेते बोलताना म्हणाले, हम दो हमारे बारा या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज करण्यात आले आहे. त्यात पवित्र कुराण ग्रंथाचा अवमान करण्यात आला आहे. कुराणमध्ये सांगितलेला संदेश आणि उपदेशांचा चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी चुकीचा अर्थ लावून प्रक्षोभक आणि अपमानास्पद रीतीने चित्रित केले गेले आहे, यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.आणखी एका मुस्लिम नेत्याने सांगितले की, मुफ्ती सलमान हजीरी यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या चित्रपटाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शकाला देखील अटक करावी. कोणत्याही चित्रपटाने समाजाची बदनामी करू नये.
चित्रपट केवळ मनोरंजनासाठी असतो. मनोरंजनातून उत्तम संदेश देणे गरजेचे आहे. मात्र सदर चित्रपटात मुस्लिम समाजाचा अपमान करण्यात आला असून कोणत्याही कारणास्तव हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, अशा शब्दात त्यांनी निषेध व्यक्त केला.