बेळगाव : बाकनूर (ता. बेळगाव) येथील श्री सातेरी देवी को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे उद्घाटन नुकताच उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी सोसायटीचे प्रमुख सल्लागार नारायण मजुकर होते.
माजी महापौर शिवाजी सुंठकर, बेळवट्टी येथील महालक्ष्मी सोसायटीचे अध्यक्ष बी. बी. देसाई, येळ्ळूर येथील नेताजी सोसायटीचे अध्यक्ष डी. जी. पाटील, येळूर कृषी उत्पन्न सोसायटीचे अध्यक्ष कर्लेकर माजी एपीएमसी अध्यक्ष आप्पा जाधव, सुभाष हदगल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सोसायटीचे अध्यक्ष अशोक मजूकर यांनी प्रास्ताविक केले. सोसायटीचे उपाध्यक्ष विठ्ठल मजूकर व सोसायटीच्या संचालकांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शिवाजी सुंठकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन केल्यानंतर बी. बी. देसाई यांनी फित कापून नूतन सोसायटीचे उद्घाटन केले. डी. जी. पाटील यांनी नामफलकाचे अनावरण केले. देवाप्पा शिंदे यांनी सरस्वती पूजन केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी देसाई यांनी सहकाराचे महत्व विषद करून सोसायटीच्या माध्यमातून समाजाच्या आर्थिक गरजा वेळेत पूर्ण कराव्यात व या भागाचा विकास साधावा, असे आवाहन केले. शिवाजी सुंठकर, सुभाष हदगल, डी. जी. पाटील, पुंडलीक पावशे आदीनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ठेवीदार व भागधारकांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
रवळू गोडसे यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले.