बेळगाव : झाडशहापूर स्मशानभूमीच्या जागेवर काहीजण आपली मालकी असल्याचा दावा करत आहेत. परंतु गावकरी याठिकाणी ५० वर्षांपासून अंत्यसंस्कार करत आहेत. ती स्मशानभूमीची जागा गावकऱ्यांकडे कायम ठेवावी, अशी मागणी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
उपरोक्त मागणीचे निवेदन माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
झाडशहापूर गावकरी मागील ५० वर्षांपासून सर्व्हे क्र. ४१/१/१ मधील २० गुंठे जागेचा वापर स्मशानभूमी म्हणून करतात. याची नोंद देसूर ग्रा. पं. मध्ये आहे. ग्रा. पं.ने अंत्यसंस्कारासाठी शेडची उभारणी केली आहे. सातबारा उताऱ्याच्या ११ कॉलममध्ये स्मशानभूमीची नोंद आहे. मात्र उताऱ्याच्या मालकी कॉलममध्ये मालकांची नावे आहेत. त्यामुळे काहीजण त्याठिकाणी येऊन ही जमीन आपली असल्याचा दावा करत आहेत. याठिकाणी अंत्यसंस्कार करू नका, असे बजावत आहेत. गावकऱ्यांना त्रास होत आहे. गावकऱ्यांना अंत्यसंस्कारासाठी दुसरी जागा उपलब्ध नाही. यामुळे प्रशासनाने पाहणी करून गावकऱ्यांसाठी सदर जागा कायमस्वरूपी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी मल्लाप्पा मर्वे, एम. आर. नंदिहळ्ळी, आर. बी. गोरल, आर. एन. गोरल, तुकाराम गोरल आर्दीसह गावकरी उपस्थित होते.