बेळगाव : चंदगड तालुक्याचे आमदार राजेश पाटील आणि बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांची महत्वपूर्ण बैठक बेळगाव सर्किट हाऊस येथे नुकतीच पार पडली. या बैठकीत सीमेलगत असणाऱ्या तिलारी जलाशयाजवळ अतिरिक्त जलाशय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या जलाशय निर्मितीमुळे सीमावर्तीय भागातील शेतकऱ्यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे. या जलाशयामुळे परिसरातील शेतकऱ्यांना 12 महिने पाणी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे मार्कंडेय नदीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यापूर्वी बेळगावच्या माजी नगरसेवकांनी यासंदर्भात शेट्टर यांच्याशी यासंदर्भात प्राथमिक चर्चा केली होती त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ही बैठक पार पडली.
उत्तम शेती करण्यासाठी शेतपिकाला मुबलक पाणी मिळणे आवश्यक आहे त्यामुळे या भागात अतिरिक्त जलाशय निर्मिती झाल्यास शेतकरी सुखी आणि समृद्ध होण्यास मदत होईल त्यासाठी कर्नाटकाने महाराष्ट्राला 3 टीएमसी पाणी द्यावे असे मत चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले आणि यासंदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरच या संदर्भात चर्चा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी बेळगाव उत्तरचे माजी आमदार भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, विधान परिषदचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी देखील कामाला लवकरात लवकर चालणार देण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी खासदार जगदीश शेट्टर म्हणाले की, सदर मागणीची निश्चितच दखल घेतली जाईल व त्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून दोन्ही सरकार यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. सदर बैठकीला कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता ए एस मैत्री, अविनाश फडतरे, स्वाती उरणकर यांच्यासह माजी एपीएमसी अध्यक्ष श्री. निंगाप्पा जाधव, माजी नगरसेवक अनिल पाटील, सुभाष बदल, पुंडलिक पावशे, दीपक वाघेला, हर्षवर्धन काळसेकर आदी उपस्थित होते.