बेळगाव : बामणवाडी गावातील सर्व्हे नं. 29 /बी मधील सरकारी गायरान जमिनीचा गैरवापर करून ती हडपण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत संपाद अधिकारी कल्लाप्पा बाळप्पा चिगरे हे करत आहेत. तरी या प्रकाराला तात्काळ आळा घालून सदर जमीन गावाच्या नावे अबाधित ठेवावी, अशी मागणी बामणवाडी (ता. जि. बेळगाव) ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आणि बेळगाव पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
बामणवाडी ग्रामस्थांनी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष व म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी (डीसी) आणि पोलीस आयुक्तांना सादर केले.
याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, बामणवाडी येथे 5 एकर सरकारी गायरान जमीन आहे. या जागेचे 1998 पासूनचे उतारे काढून पाहिले असता त्यामध्ये तसे नमूद असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र त्या ठिकाणचे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व विद्यमान सदस्य कल्लाप्पा चिगरे यांनी सदर 5 एकर सरकारी जमिनीपैकी 3 एकर जमीन बेकायदेशीररित्या स्वतःच्या नावे करून घेतली आहे. तहसीलदार वगैरे अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार घडला आहे. सदर तीन पैकी 2 एकर जमिनीमध्ये शाळा, पाण्याची टाकी, गावाला पाणी पुरवठा करणारी बोअरवेल वगैरे गोष्टी आहेत. या पद्धतीने गायरान अर्थात गावच्या मालकीची असणारी ही जमीन चिगरे यांनी स्वतःच्या वैयक्तिक नावावर करून घेतली आहे.
याबाबत जाब विचारला असता चार-पाच दिवसांपूर्वी बेळगाव शहरातील गुंडांकरवी गावकऱ्यांवर दादागिरी करून महिलांना अर्वाच्य शिवीगाळ करण्यात आली असल्याची माहिती देऊन एकंदर या पद्धतीने सरकारी जमीन घशात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब गावकऱ्यांनी सरकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
त्याचप्रमाणे बामणवाडी येथील पंचमंडळी व महिलांसह गावकरी आज येथे पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यास जमले आहेत. यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार आहोत, असे रमाकांत कोंडुसकर यांनी सांगितले.