Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगावच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव मधील नागरिकांची दीर्घकाळची मागणी असलेल्या शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते झाले.

बेळगाव मधील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात निर्माण झालेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय, गृह वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वस्तीगृहाचे कोनशिला, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या शहर बस स्थानकाचे उद्घाटन आणि राणी चन्नम्मा विद्यापीठांतर्गत निर्माण होणाऱ्या इमारत बांधकाम प्रकल्पांचे उद्घाटन अशा विविध कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.

यावेळी बेळगावचे जिल्हा पालकमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, बेळगाव जिल्ह्यातील गरिबांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी हा दीर्घकाळचा प्रकल्प आज साकारत आहे. याव्यतिरिक्त, वैद्यकीय शिक्षण मंत्री शरण प्रकाश पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे लवकरच येथे कॅन्सर रुग्णालय देखील सुरू केले जाईल.

महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हंटले की, प्रत्येक जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याच्या राज्य काँग्रेस सरकारच्या धोरणाचे हे कार्य प्रमाण आहे. रुग्णांनी या सुविधांचा आवश्यक सदुपयोग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री शरण प्रकाश पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले की, खासगी रुग्णालये अतिशय जास्त दरात उपचार पुरवत असल्याने, त्यांना टक्कर देण्याच्या उद्देशाने शासकीय पातळीवर कमी खर्चात सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. यामुळे गरिबांना सेवा मिळेल. हे शासकीय रुग्णालय खासगी संस्थेकडे दिलेले नाही. के.एल.ई. रुग्णालयाचे डॉक्टर सध्या येथे मोफत सेवा देत असल्याबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच, रुग्णालयातील सर्व रिक्त पदे लवकरच भरली जातील, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उत्तर विधानसभा आमदार आसिफ सेठ यांनी भूषवले.

यावेळी मंत्री रामलिंगा रेड्डी, उच्च शिक्षण मंत्री एम. सी. सुधाकर, आमदार राजू कागे, महांतेंश कौजलगी, बाबासाहेब पाटील, महेंद्र तम्मण्णावर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, नागराज यादव आणि के.एल.ई. चे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *