Sunday , July 26 2026
Breaking News

द्वितीय पी.यू.सी. वार्षिक परीक्षेसाठी सज्जता : कुमार गंधर्व सभागृहातील मार्गदर्शक आढावा बैठक

Spread the love

 

बेळगाव : येथील कुमार गंधर्व सभागृह येथे द्वितीय पी.यू.सी. वार्षिक परीक्षेच्या पूर्वतयारी संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यांतील नव्वदपेक्षा अधिक परीक्षा केंद्रांचे केंद्रप्रमुख, उत्तरपत्रिका प्रमुख, सहप्रमुख, विविध तालुक्यांतील बी.ई.ओ., तसेच पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी चिकोडी येथील शिक्षणाधिकारी श्रीयुत बिरादार यांनी परीक्षेची पारदर्शकता, सुरक्षितता आणि शिस्त अबाधित राखण्यासाठी आवश्यक असलेल्या सूचनांचे मार्गदर्शन केले. त्यानंतर बेळगाव जिल्ह्याचे डी.डी.पी.यू. श्री. एम. एम. कांबळे यांनी अत्यंत सुसूत्र, नेमक्या आणि प्रभावी शब्दांत संपूर्ण परीक्षाव्यवस्थेचा व्यापक आढावा मांडला.

उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिकांची सुरक्षित हाताळणी, केंद्राधिकाऱ्यांची जबाबदारी, पर्यवेक्षकांची दक्षता, विद्यार्थ्यांची योग्य बैठक व्यवस्था, सीसीटीव्ही व वेब कॅमेऱ्याद्वारे निरीक्षण, वेबकास्टिंगची अंमलबजावणी, मोबाईल निषेध अशा प्रत्येक घटकावर त्यांनी बारकाईने प्रकाश टाकला. बोर्ड परीक्षा ही केवळ औपचारिकता नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा निर्णायक टप्पा आहे, याची जाणीव त्यांनी समर्पक उदाहरणांद्वारे प्रभावीपणे करून दिली.

श्री. कांबळे यांच्या चतुरस्र बुद्धिमत्तेचे, प्रशासनातील दूरदृष्टीचे आणि विषय मांडण्याच्या नेमक्या शैलीचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रत्येक अधिकाऱ्याच्या मनात जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली.

बैठकीच्या समारोपावेळी, परीक्षा यशस्वी आणि निर्विघ्न पार पाडणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा ठाम संदेश देण्यात आला. त्याचबरोबर परीक्षा केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची काळजीपूर्वक व संवेदनशीलतेने वागणूक द्यावी, विद्यार्थ्यांना भीती नव्हे तर आत्मविश्वास आणि अभिमानाची भावना निर्माण झाली पाहिजे, असे विशेष आवाहन करण्यात आले.

अंगविकलांग तसेच अंध विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्याची सूचना देत समावेशकतेचा मानवी संदेशही या बैठकीतून देण्यात आला.

चिकोडी प्रभारी डी डी पी यू ए एस कोळी यांनी ही मार्गदर्शन केले.

ही आढावा बैठक केवळ नियोजनापुरती मर्यादित न राहता जबाबदारी, संवेदनशीलता आणि शैक्षणिक बांधिलकी यांची जाणीव अधिक बळकट करणारी ठरली. येणारी द्वितीय पी.यू.सी. परीक्षा निश्चितच शिस्तबद्ध, पारदर्शक आणि यशस्वी होईल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.

सुत्रसंचालन प्रा. श्री. बंजत्री यानी केले.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *