कुद्रेमानी (रवी पाटील) : विविधोद्धेश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची ७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. १९४९ साली स्थापन झालेल्या या संघटनेने यंदा अमृतमहोत्सवी वर्षात प्रवेश केला आहे. या विशेष निमित्ताने झालेल्या सभेचे अध्यक्षस्थान संघाचे चेअरमन श्री. जोतिबा मारूती बडसकर यांनी भूषवले, तर व्हा चेअरमन श्री. मल्लाप्पा गुंडू कदम व संचालक मंडळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
अहवाल सादरीकरण
संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बाळाराम धामणेकर यांनी वार्षिक अहवाल सादर करताना, संघटनेच्या ९९७ सभासदांची माहिती दिली. यंदाच्या आर्थिक वर्षात संघटनेला रु. १,७७,१५६.७५ नफा झाला असून, सभासदांना ५% लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच, ०% व्याजदराने एकूण रु. ७३,६२,००० कर्ज वितरित करण्यात आले, ज्यामध्ये लहान शेतकऱ्यांना रु. ६९,६२.००० तर मोठ्या शेतकऱ्यांना रु. ४,००,००० चे कर्ज वाटप करण्यात आले.
सत्कार समारंभ
कार्यक्रमात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले आणि चिटणीस मल्लाप्पा बळवंत गुरव यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराचे मानकरी श्री. जोतिबा बडसकर यांच्या हस्ते हा सन्मान झाला. यावेळी संचालक मंडळाचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शन
यावेळी रवी पाटील सर आणि आर. एम. चौगुले यांनी सभासदांना सहकार क्षेत्रातील महत्त्वावर मार्गदर्शन केले. त्यांनी संघटनेच्या प्रगतीच्या वाटचालीचे कौतुक करत, भविष्यातील योजनांवर विचार मांडले.
अध्यक्षीय भाषण
अध्यक्षीय भाषणात श्री. जोतिबा बडसकर यांनी संघटनेच्या आगामी योजनांवर भर देत, कुद्रेमानी येथे सुपर मार्केट सुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला. या निर्णयामुळे संघटनेच्या सभासदांना मोठा फायदा होईल, असे ते म्हणाले. तसेच, सभासदांच्या हितासाठी नेहमीच निर्णय घेतले जातील, याचे आश्वासन त्यांनी दिले.
या यशस्वी खेळीमेळीच्या वातावरणात सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. सभेच्या शेवटी सर्व उपस्थितांनी संघटनेच्या भविष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.