आनंद वाझ यांची पत्रकार परिषदेत माहिती
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मध्यवर्ती असलेल्या सर्वे नंबर ५३ /अ या सरकारी जागेवर बेकायदेशीर गाळे उभारून लाखो रूपये हडप करण्याचे प्रकार सुरू असुन याकडे अधिकारीच दुर्लक्ष करत असल्याने नगर पंचायतीचा लाखोंचा महसुल बुडीत चालला आहे. तेव्हा या जागेवरील अतिक्रमण हटवून सदर जागा सरकाने ताब्यात घ्यावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते आनंद वाझ यानी केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, खानापूर तालुका अधिकारी वर्गाकडून सरकारच्या जागेवर तसेच सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्यात दुर्लक्ष होत आहे. याचा गैरफायदा घेत शहरात अनेकानी सरकारी जागेवर अतिक्रमण केले आहे.
येथील शिवस्मारक चौकात सरकारने ५ गुंठे जागा क्रिडा मंडळ क्लबला लिजवर दिली होती.
मात्र मंडळाच्या पदाधिकारी वर्गाने बेकायदेशीररित्या ही मालमत्ता लक्ष्मण शेट्टी व परमकला शेट्टी यांना विकली. याचे खरेदी पत्र २००९ साली केले आहे. नगरपंचायतीच्या दप्तरात सार्वजनिक मालमत्ता म्हणून सरकारी नोंद आजही आहे. असे असताना बनावट नोंदणी पत्राचा आधार घेऊन खोटी पत्र तयार करून सरकारी जागेत कायमस्वरूपी शेड उभारले आहे. सरकारी जागा असताना खासगी व्यक्तीने अधिकार प्रस्तापित करता येत नाही. या जागेवर गेल्या कित्येक वर्षांपासून कब्जा घेतला आहे.
याशिवाय या मालमत्तेचा नगरपंचायतीला एकदाही टॅक्स भरला नाही. इतकेच नव्हे तर याजागेवर गाळे उभारून त्याचे भाडे हडप करत आहेत. या जागेवर सरकारचे नाव असुन मात्र सरकारी अधिकारी यावर ताबा मिळविण्यास असमर्थ ठरले आहेत, असा आरोप आनंद वाझ यांनी केला आहे.
यासाठी प्रादेशिक आयुक्त, जिल्हाधिकारी याचेकडे तक्रार करून या सरकारी जागेवर अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे.