खानापूर : माचीगड (ता. खानापूर) येथील सुब्रम्हण्य साहित्य अकादमीच्या वतीने झालेल्या 26 व्या मराठी साहित्य संमेलनात पत्रकारितेसाठी दिला जाणारा आचार्य अत्रे आदर्श पत्रकार पुरस्कार दै. पुढारीचे पत्रकार वासुदेव चौगुले यांना देऊन सन्मानित करण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, माजी आमदार दिगंबर पाटील, महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, अकादमीचे अध्यक्ष बाबुराव पाटील, वास्तु विशारद पीटर डिसोजा, मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, शिवसेनेचे राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील आदिंच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या पंधरा वर्षापासून ते दै. पुढारी वृत्तपत्रात बातमीदार म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते पुढारीचे खानापूर तालुका प्रतिनिधी आणि संपर्क कार्यालय प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सीमालढा, शेतकऱ्यांचे प्रश्न, साहित्य तसेच पर्यावरणाशी संबंधित विषयांवर त्यांनी केलेल्या लेखनाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला. यापूर्वीही त्यांचा क्रांती सेना संघटना, महालक्ष्मी ग्रुप, मराठा मंडळ महाविद्यालय यासह विविध संघ संस्थांच्या वतीने पत्रकारितेच्या योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मान झाला आहे.