खानापूर : कुप्पटगिरी- खानापूर रस्त्यावरील नाल्यावर असलेल्या दगडी पूलाची ग्रामस्थांनी श्रमदानातून आज डागडूजी केली. सदर पूलाला भगदाड पडले होते व वाहतुक करणे धोक्याचे ठरत होते. कुप्पटगिरी रस्त्यावरील हा पूल उंचीला कमी असल्याने दर वर्षी पावसाळ्यात नाल्याचे पाणी पुलावरून वाहत जाते व त्याकाळात पूलावरून रहदारी बंद होते. तशात हा पूल आता भगदाड पडून ढासळत असल्याने नाल्याचे पाणी ओसरले तरी रहदारीला धोका कायम आहे. हा पूल मुळात अरुंद आहे. त्यामुळे एकावेळी एकच चारचाकी वाहन त्यावरून जाऊ शकते. त्यात पुलावरील रस्ता पार उखडून गेला होता, त्यात मोठे खड्डे व आता भगदाड पडलेले होते. तरी दुचाकी वाहनांवरून अबालवृद्ध पुरुष व महिलांचे पुलावरून जाणे चालुच असे. खानापूरला जाण्याचा जवळचा रस्ता म्हणून गावकरी या रस्त्याने जाणे पसंत करतात. त्यात शालेय मुला- मुलींच्या रहदारीचे प्रमाणही मोठे आहे. शालेय मुले धाडस करून पूलावरून जाताना दिसायची. हे अपघाताला आपणहून आमंत्रण दिल्यासारखे आहे. गावाला जाण्यासाठी पर्यायी रस्ता आहे पण तो मार्ग लांबचा असल्याने कठीण वाटले. तरी सदर पूलावरून जाणे-येणे थांबले नव्हते. या संबंधाने ग्रामस्थांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी तथा ग्राम पंचायत, जिल्हा पंचायत आदिंकडे पूलाच्या दुरुस्तीची मागणी निवेदनाद्वारे केली होती. परंतु सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी केवळ पाहणीच केली कृती नाही. सदर पुलासाठी पूर्वी निधी सुद्धा मंजूर करण्यात आला होता, पण प्रत्यक्षात कोणतेच काम झाले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. एकुणच लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेने लोकांना त्यांच्या हालअपेष्टा सोसायला सोडून दिले आहे असे दिसते. येथे ग्रामस्थांची निकडीची बाब समजून तातडीची उपाययोजना करणे आवश्यक होते. पण घडले कांहीच नाही. अशा दिरंगाईच्या प्रकाराला कंटाळून व आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पाहून कुप्पटगिरीतील गावकऱ्यांवर सरकारी मदतीशिवाय स्वखर्चातून सदर पुलाची डागडूजी करण्याची वेळ आली. ती त्यांनी श्रमदानातून केली. याकामी कुप्पटगिरी गावच्या भावकेश्वरी युवक संघ, म. ए. समिती सदस्य तथा गावच्या कांही अन्य तरुण ग्रामस्थांनी सहकार्य दिले. यामुळे तालुक्यात रामगुरवाडी गावापाठोपाठ आता कुप्पटगिरीवासीयांनी देखील सरकारी यंत्रणा व लोकप्रतिनिधिंना जाग आणण्यासाठी पाऊल उचलल्याचे दिसते. रामगुरवाडीवासीयांनी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये भाताची रोपे लाऊन उपरोधाने का असेना आपल्याकडे होत असलेले दुर्लक्ष दाखवले तर कुप्पटगिरीवासीयांनी आपल्या श्रमदानातून डागडुजी करून ‘आपल्या समस्यांचे निवारण आपणच केले पाहिजे’ हि उक्ती सार्थ करून दाखवली आहे.