खानापूर : भीमगड वन्यजीव अभयारण्यात येणाऱ्या तळेवाडी (ता. खानापूर) येथील २७ विस्थापित कुटुंबांनी स्वेच्छेने जंगलाबाहेर स्थलांतर करण्यास सहमती दिल्यानंतर आज (शनिवार, १७ मे) या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. हेमाडगा येथे झालेल्या या विशेष कार्यक्रमात वनमंत्री ईश्वर खंड्रे, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर तसेच बेळगाव जिल्हाधिकारीही उपस्थित होते.
बळजबरीने स्थलांतर होणार नाही याची काळजी : वनमंत्री ईश्वर खंड्रे
जंगलातील वस्ती जंगलाबाहेर हलविल्यामुळे वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन होते आणि जंगलातील रहिवाशांचे जीवनमानही उंचावते, असे प्रतिपादन वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी केले.
यावेळी ईश्वर खंड्रे म्हणाले, गेल्या डिसेंबर महिन्यात विधानमंडळ अधिवेशनादरम्यान भिमगड अभयारण्याला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी जंगलात डोक्यावर किराणा सामान वाहून नेत असलेल्या महिलांना पाहून आपली गाडी थांबवून त्यांच्याशी संवाद साधला होता. त्या वेळी एका महिलेनं आपल्या पतीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे दुःख व्यक्त केले, तर दुसऱ्या महिलेनं तिच्या पतीवर अस्वलानं हल्ला करून तो कायम अपंग झाल्याचं सांगितलं. या घटना मन हेलावून टाकणाऱ्या होत्या, असंही त्यांनी नमूद केलं. त्यानंतर त्यांनी तळेवाडी गावाला भेट दिली असता, तेथील कुटुंबांनी स्वेच्छेने जंगलाबाहेर स्थलांतर करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, आज ती यशस्वी झाली आहे. या पहिल्या टप्प्यात २७ कुटुंबांना प्रत्येकी १० लाखांची आर्थिक मदत देण्यात आली असून, उर्वरित ५ लाख त्यांचे संपूर्ण स्थलांतर पूर्ण झाल्यानंतर दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.