Sunday , July 26 2026
Breaking News

मेरडा……. देवीचं आजोळ निघालं, हलशीला, मानाच्या ओटीने परंपरा उजळायला!

Spread the love

 

काही नावं उच्चारली की ती केवळ शब्द न राहता आठवणी जाग्या करतात. मेरडा हे असंच एक नाव आहे. हे नाव घेताच मन नकळत वाकतं, कारण मेरडा म्हणजे फक्त एक गाव नाही, ते देवीचं आजोळ आहे. आजोळ म्हणजे नात्यांची पहिली शाळा, मायेचा पहिला हात, श्रद्धेची पहिली ओळख आणि संस्कारांची पहिली शिदोरी. पिढ्यान्‌पिढ्या जपत आलेली हीच भावना मेरडा गावाला श्री महालक्ष्मी देवीच्या आजोळाचा मान देते….. आजोळाचं नातं सांगावं लागत नाही; ते मनात रुजलेलं, रक्तात मिसळलेलं असतं. म्हणूनच देवीच्या चरणी अर्पण होणारी मानाची ओटी ही केवळ परंपरा नसून आपुलकीची खूण, निष्ठेचा मान आणि श्रद्धेची साक्ष असते. गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी मेरडा येथील श्री महालक्ष्मी मंदिरात हा पवित्र आहेर व ओटी सोहळा हलशी येथे भक्तिभावाने आणि मंगल वातावरणात संपन्न होणार आहे. आजोळ म्हणून मेरड्याच्यावतीने देवीला अर्पण केलं जाणारं काही मोजमापात बसणारं नसतं; त्यात आईच्या ओटीची उब, वडिलांचा विश्वास, आजी-आजोबांची श्रद्धा आणि पुढील पिढ्यांसाठीचं आश्वासन दडलेलं असतं. देवीचा आशीर्वाद म्हणजे फक्त वरदहस्त नाही; तो आयुष्याच्या वाटेवर पडलेला उजेड आहे. अडचणींच्या अंधारात तोच धीर देतो, मेहनतीला बळ देतो आणि मनाला सांगतो—घाबरू नकोस, मी आहे. मेरड्याची माती अशीच आहे; इथे श्रद्धा मिरवली जात नाही, ती जपली जाते. इथे परंपरा गाजत नाही, ती शांतपणे चालत राहते. मंदिराच्या पायऱ्यांवर वाकलेली मस्तकं ही लाचारीची नाहीत, ती आजोळाच्या जबाबदारीची साक्ष असते. या पवित्र दिवशी सकाळी ठीक ९ वाजता सर्व ग्रामस्थांनी, माता-भगिनींनी, युवक-युवतींनी, ज्येष्ठांनी तसेच परिसरातील सर्व देवीभक्तांनी श्री महालक्ष्मी मंदिरात उपस्थित राहून देवीच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ पंचकमिटी, मेरडा यांच्या वतीने करण्यात येत आहे तरी हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी बस्तवाड व करजगी गावेने ही आपली उपस्थिती नोंदवावी.
आजच्या धावपळीच्या जीवनात वेळ थांबत नाही, पण आजोळाचं नातं कधीही थांबत नाही. कामं पुढे ढकलता येतात, पण परंपरेची ओळख नाही. कारण आजोळ काही मागत नाही; ते फक्त देत असतं….. देवतांची कृपा, नात्यांची ऊब आणि “आम्ही आहोत” ही निश्चिंत खात्री. लक्षात ठेवा, मेरडा हे देवीचं आजोळ आहे आणि आजोळाच्या ओटीतून मिळणारा श्री महालक्ष्मी देवीचा आशीर्वाद हे आयुष्यभर पुरेल असं सर्वात मोठं संचित आहे.
……
समस्त मेरडा ग्रामस्थ!

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *