Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूर शहरांतर्गत रस्त्याची 2 व 3 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष जागेवर हद्द मोजणी व मार्किंग

Spread the love

 

खानापूर : खानापूर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या हद्दीबाबत सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी रस्त्याच्या सीमांकन (मार्किंग) प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे. शहरातील रस्त्यांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून दि. 2 व 3 फेब्रुवारी 2026 रोजी प्रत्यक्ष जागेवर हद्द मोजणी व मार्किंग करण्यात येणार आहे.

माजी नगरसेवक दिनकर मरगाळे व विवेक गिरी यांनी केलेल्या उपोषणामुळे तसेच खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने आणि सर्वपक्षीय नेतेमंडळींनी लढ्याला दिलेल्या पाठिंब्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

खानापूर शहरातील विविध सर्वे नंबरला लागून असलेल्या रस्त्यांच्या हद्दी निश्चित करण्यासाठी भूदाखले विभागाकडून अधिकृत कारवाई हाती घेण्यात आली आहे. यासंदर्भात भूदाखले सहायक संचालक, खानापूर यांनी अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

या जाहीरनाम्यानुसार, खानापूर गावातील रि.स.नं. 95/अ, 95/ब, 96/अ, 96/ब, 51, 49, 48, 97, 95 व 96 या सर्वे नंबरलगत असलेल्या रस्त्यांची मोजणी दि. 14 जानेवारी 2026 रोजी पूर्ण करण्यात आली होती. त्यानंतर सर्वे अभिलेखांची तपासणी करून नकाशा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार, दि. 2 व 3 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता संबंधित रस्त्याच्या हद्दींची प्रत्यक्ष ठिकाणी ओळख (सीमांकन) व मार्किंग करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी संबंधित सर्व पक्षकार, अधिकारी व नागरिकांनी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन भूदाखले सहायक संचालकांनी केले आहे. या कारवाईनंतर संपूर्ण अहवाल कार्यालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या संदर्भात तालुका तहसीलदार, लोकोपयोगी विभाग (PWD), खानापूर उपविभाग व खानापूर नगर पंचायत यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शांतता भंग होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस विभागाचे कर्मचारी, महसूल निरीक्षक व ग्राम प्रशासन अधिकारी यांनाही उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.

खानापूर नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना रस्त्यालगतच्या इमारतधारक व नागरिकांना पूर्वसूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित प्रकरणातील अर्जदारांचे वकील अ‍ॅड. आय. आर. घाडी (खानापूर) यांनाही या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया वरिष्ठ भूमापक श्री. राजप्पा पट्टणशेट्टी व श्री. हरीश गणाचारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *