Sunday , July 26 2026
Breaking News

फेरमूल्यांकनानंतर झुंजवाड (के.एन.) येथील दिव्या देसाई 625 पैकी 625 गुणांसह कर्नाटकात संयुक्त अव्वल

Spread the love

 

खानापूर : तालुक्यातील झुंजवाड (के.एन.) येथील कु. दिव्या प्रदीप देसाई हिने आपल्या चिकाटी, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर राज्यस्तरीय ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. फेरमूल्यांकनानंतर तिने 625 पैकी तब्बल 625 गुण मिळवत कर्नाटकात संयुक्त प्रथम क्रमांक मिळवला.

प्राथमिक निकालात दिव्याला 625 पैकी 624 गुण मिळाले होते. सर्व विषयांत शंभर पैकी शंभर गुण मिळवतानाच इंग्रजी विषयात 125 पैकी 124 गुण मिळाल्याने ती राज्यात द्वितीय स्थानी होती. मात्र आपल्या उत्तरपत्रिकेबाबत तिला पूर्ण खात्री होती. त्यामुळे तिने कोणतीही शंका न बाळगता फेरमूल्यांकनासाठी अर्ज दाखल केला.

तिच्या आत्मविश्वासाला अखेर यश लाभले. पुनर्तपासणीनंतर इंग्रजी विषयातही तिला पूर्ण १२५ पैकी १२५ गुण प्रदान करण्यात आले. यामुळे तिच्या एकूण गुणसंख्येत वाढ होऊन ती ६२५ पैकी ६२५ गुणांसह राज्यात संयुक्त अव्वल ठरली.
दिव्याच्या या दैदिप्यमान यशामुळे झुंजवाडसह संपूर्ण खानापूर तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणेचे प्रतीक बनली आहे.

या यशामागे दिव्याचे अथक परिश्रम, पालकांचे पाठबळ आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन कारणीभूत ठरले. “स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि सातत्याने प्रयत्न करत राहा,” हा संदेश दिव्याच्या यशातून विद्यार्थ्यांना मिळत आहे.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *