Saturday , May 30 2026
Breaking News

यडोगा येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांची पहिली बैठक उत्साहात

Spread the love

 

खानापूर : खानापूर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांतर्फे यडोगा येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या बैठकीला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मराठी भाषा, संस्कृती आणि सीमाभागातील मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित युवकांनी व्यक्त केला.
खानापूर तालुक्यातील विविध गावांतील युवा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मराठी समाजाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविण्यासाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्णय घेतला असून, त्याच अनुषंगाने ही पहिली बैठक पार पडली. बैठकीत मराठी भाषा, शिक्षण, सांस्कृतिक जतन तसेच सीमाभागातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामा खांबले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, युवा कार्यकर्ते समितीच्या झेंड्याखाली एकवटत आहेत ही अत्यंत आनंदाची आणि स्वागतार्ह बाब आहे. सीमाभागातील मराठी जनतेचा लढा पुढे नेण्यासाठी तसेच तालुक्यात मराठीचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी प्रत्येक गावातील युवकांनी संघटित होऊन कार्यरत राहणे आवश्यक आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीवर होणाऱ्या अन्यायाविरोधात युवकांनी पुढाकार घेऊन संघर्षाची धुरा सांभाळावी, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत परिवहन मंडळाच्या बसवर मराठी भाषेत फलक लावण्यात यावेत, यासाठी संघटितपणे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच तालुक्यातील विविध गावांमधील मराठी शाळांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे ठरविण्यात आले. मराठी शिक्षण टिकवून ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी युवकांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
याशिवाय तालुक्याच्या विविध विभागांमध्ये स्वतंत्र बैठका घेऊन युवकांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. मराठी भाषा, संस्कृती आणि सीमाभागातील प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यापक अभियान राबविण्याचेही ठरले.
या बैठकीला मल्लाप्पा अंधारे, संदीप अंधारे, नारायण खांबले, कार्तिक नांदुलकर, उमेश अंधारे, उद्धव भेकने, ऋतिक कुपटेकर, चेतन हंगिंगेकर, यल्लाप्पा बेळगावकर, ओमकार चोपडे, भास्कर पाटील, श्री पाटील, शुभम कांबळे, बाळकृष्ण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मुकेश गुरव, प्रसन्न पाटील, यतीन पाटील,बापू, रोशन मदार, नामदेव इस्रान, श्रीहरी पाटील, नागराज केसरेकर, लक्ष्मण शास्त्री, कपिल, गोपाळ सुतार, जोतिबा लोहार, ज्योतिबा पाटील, दामोदर निलजकर, नारायण नंदूरकर, मोहन देवळटकर, विष्णू देवळटकर, रोहित कुपटेकर, तुकाराम सनदी, यांच्यासह तालुक्यातील विविध गावांतील युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित युवकांनी मराठी समाजाच्या विविध प्रश्नांवर एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त करत समितीच्या कार्याला अधिक बळकटी देण्याचा संकल्प केला.

About Belgaum Varta

Check Also

पोक्सो प्रकरणातील साक्षीदाराला धमकी देणारा युवक गजाआड

Spread the love  बेळगाव : पोक्सो प्रकरणातील साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी देऊन न्यायालयात साक्ष देण्यापासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *