Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्याची मानवाधिकार संघटनेची मागणी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : आगामी निपाणी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व इच्छुक उमेदवारांनी एकत्र येऊन सर्वपक्षीय बैठक घ्यावी, असे आवाहन फोर- जे- आर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित बैठकीत करण्यात आले आहे.
बैठकीतील माहिती अशी, निपाणी नगरपालिकेच्या इतिहासात आजपर्यंत निवडणुका शांततापूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या आहेत. येणाऱ्या निवडणुकीत ३१ प्रभागांसाठी सुमारे २०० हून अधिक इच्छुक उमेदवार रिंगणात उतरणार असून प्रत्येक उमेदवार शहराच्या विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक घडवणार आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सर्व राष्ट्रीय, राज्य, अपक्ष इच्छुक उमेदवारांनी एकत्र येऊन विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करून सामायिक विकास जाहीरनामा तयार करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
जवाहर तलावातील गाळ काढून त्याचे पुनरुज्जीवन, शहर व उपनगरातील रस्ते, पथदीप, गटारी व नाल्यांची दुरुस्ती, अतिक्रमण हटाव मोहीम, शहराचा सुधारित मास्टर प्लॅन, निपाणीच्या प्रवेशद्वारांचे सुशोभीकरण, दत्त खुले नाट्यगृह परिसरातील प्रश्न, गांधी हॉस्पिटलमध्ये तालुका पातळीवरील सुविधा उपलब्ध करणे, शहरातील एकमेव ट्राफिक सिग्नल सुरू करणे यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा व्हावी.
निवडणूक ही वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांची न राहता विकासाची मैत्रीपूर्ण लढत व्हावी. शहरातील वाहतुक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने बैठक घेऊन यावर पर्याय काढला पाहिजे. यासह विविध विषयावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी ‌नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी अपेक्षा फोर जे-आर ह्युमन राइट्स केअरने केली आहे. बैठकीस सचिन पवार, ज्ञानेश्वर चव्हाण, राहुल ताडे, प्रशांत पाटील, अशोक खांडेकर, योगेश कांबळे, युवराज शेटके, संतोष मावरकर, अविनाश माने, योगेश पोतदार, अतुल पारळे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *