Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूरच्या युवकाची नेपाळमध्ये हत्या; रूम पार्टनरवर संशय, आरोपीचा शोध सुरू

Spread the love

 

खानापूर : खानापूर शहरातील मुस्लिम निंगापूर गल्ली येथील रहिवासी साहिल रियाजअहमद मोमीन (वय २५) यांची नेपाळमध्ये चाकूने वार करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१० जुलै) पहाटे घडली. या घटनेमुळे खानापूर शहरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात साहिलचा रूम पार्टनर सद्दाम हुसेन (मूळ उत्तर प्रदेश) याच्यावर संशय असून, घटनेनंतर तो फरार झाला आहे. नेपाळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.

साहिल मोमीन हा काही वर्षे दुबई व थायलंडमध्ये काम केल्यानंतर सुमारे २५ दिवसांपूर्वी नेपाळमधील झापा जिल्ह्यातील दमक येथील एका हॉटेलमध्ये नोकरीसाठी गेला होता. तेथे तो संशयित आरोपीसोबत राहत होता.

घटनेच्या आदल्या रात्री साहिल आणि सद्दाम यांच्यात वाद झाल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी बेळगावहून आलेल्या एका मित्राने मध्यस्थी करून वाद मिटवला होता. मात्र, पहाटे साहिल झोपेत असताना त्याच्यावर चाकूने वार करण्यात आल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच साहिलच्या कुटुंबीयांनी अंजुमन-ए-इस्लामचे तालुकाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते इरफान तालिकोटी यांच्याकडे मदतीची विनंती केली. त्यांनी बेळगाव जिल्हा पोलिसांशी तसेच नेपाळमधील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कायदेशीर प्रक्रिया आणि मृतदेह भारतात आणण्याबाबत समन्वय सुरू केला.

साहिलचे वडील, भाऊ आणि इतर नातेवाईक शनिवारी नेपाळला रवाना झाले असून, मृतदेह विमानाने भारतात आणण्यात येणार आहे. उपलब्धतेनुसार हुबळी, गोवा किंवा बेळगाव विमानतळावर मृतदेह आणल्यानंतर सोमवारी खानापूर येथे पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, आरोपी उत्तर प्रदेशाच्या दिशेने पळाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, बेळगाव पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधून संशयिताची माहिती आणि छायाचित्र पाठविल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेमुळे परदेशात रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, साहिल मोमीन यांच्या अकाली निधनाबद्दल खानापूर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *