

खानापूर : खानापूर तालुक्यातील चन्नेवाडी येथील ग्रामस्थांनी गावासाठी स्वतंत्र मतदान बूथ तसेच कसबा नंदगड ग्रामपंचायतीत स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्याची मागणी करत मतदार नोंदणी अधिकारी बलराम चव्हाण व खानापूरचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार, यांना निवेदन सादर केले.
निवेदनात ग्रामस्थांनी नमूद केले आहे की, सुमारे 20 ते 25 वर्षांपूर्वी चन्नेवाडी व भुत्तेवाडी येथील मतदारांसाठी चन्नेवाडीच्या प्राथमिक शाळेत मतदान केंद्र होते. मात्र, नंतर मतदारसंख्येच्या आधारे हे मतदान केंद्र भुत्तेवाडी येथे हलविण्यात आले. भुत्तेवाडीतील मतदान केंद्राला कोणताही आक्षेप नसला तरी चन्नेवाडीतील मतदारांना मतदानासाठी लांब अंतराचा प्रवास करावा लागत असल्याने वयोवृद्ध, दिव्यांग तसेच इतर नागरिकांची गैरसोय होत असून काही मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे चन्नेवाडीच्या प्राथमिक शाळेत स्वतंत्र मतदान बूथ सुरू करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यासोबतच कसबा नंदगड ग्रामपंचायतीमध्ये चन्नेवाडी व भुत्तेवाडी या दोन्ही गावांचा एकच वॉर्ड असून तीन ग्रामपंचायत सदस्य निवडले जातात. भुत्तेवाडीची मतदारसंख्या चन्नेवाडीपेक्षा दुप्पट असल्याने चन्नेवाडी गावाला ग्रामपंचायतीत प्रतिनिधित्व मिळणे कठीण होत असून गावाच्या विकासकामांवर त्याचा परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे चन्नेवाडीसाठी स्वतंत्र वॉर्ड निर्माण करून गावाला न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मतदार नोंदणी अधिकारी व तहसीलदारांनी या निवेदनाची दखल घेऊन स्वतंत्र मतदान बूथ व स्वतंत्र वॉर्ड निर्मितीसाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.
या निवेदनावर शामराव क. पाटील, धनंजय रा. पाटील, रणजीत शा.पाटील, परशराम मा. ऱ्हाटोळकर, मुरलीधर पु.पाटील, रामचंद्र स. ऱ्हाटोळकर, भरमाजी वि.पाटील, महादेव सी. ऱ्हाटोळकर, सुहास क. पाटील, श्रीनाथ वि. पाटील, नागेश व. पाटील, प्रशांत क. पाटील लक्ष्मण वि. पाटील, विष्णू ल. पाटील, विठ्ठल पु.पाटील, नागोजी क. पाटील, सुधाकर वि. पाटील, सदानंद रा. पाटील, घुराप्पा सु. पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत,तसेच निवेदन देतेवेळी हे सर्वजण उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta