Sunday , July 26 2026
Breaking News

सीमा प्रश्न निकाली काढणे हेच एकमेव ध्येय : गोपाळ देसाई

Spread the love

 

मध्यवर्तीच्या कोणताही निर्णयात खानापूर समितीचा पाठिंबा

खानापूर : मुंबई येथे ८ जुलै रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत सीमा प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून न्यायालयीन लढ्याला गती मिळाल्याचे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे खानापूर तालुका अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी व्यक्त केले. सीमा प्रश्न निकाली काढणे हेच आता एकमेव ध्येय असून, मध्यवर्ती समितीने भविष्यात कोणताही निर्णय घेतला किंवा आंदोलनाची हाक दिल्यास खानापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने पाठिंबा देऊन सीमा प्रश्न अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
खानापूर येथील शिवस्मारक येथे सोमवारी झालेल्या तालुका समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीचे प्रास्ताविक व स्वागत सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले.
गोपाळ देसाई म्हणाले की, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे व समितीचे पदाधिकारी सीमा प्रश्नासह इतर विषयांवर सातत्याने तळमळीने आवाज उठवत आहेत. त्यामुळे सीमाभागात नव्या उमेदीचे वातावरण निर्माण झाले आहे. उच्चाधिकार समितीच्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयातील सीमा प्रश्नाच्या दाव्यासाठी अतिरिक्त वरिष्ठ वकील नियुक्त करणे, केंद्र सरकारशी समन्वय वाढविणे, सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात ठोस भूमिका घेणे तसेच दर महिन्याला कोल्हापुरात समन्वयक मंत्र्यांची बैठक घेण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मध्यवर्ती समिती प्रयत्नशील असून त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी सांगितले की, उच्चाधिकार समितीच्या बैठकीनंतर सीमा प्रश्न योग्य दिशेने पुढे सरकत आहे. आगामी बैठकीत या प्रश्नाच्या पुढील लढ्याची रूपरेषा निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी धनंजय पाटील, प्रकाश चव्हाण, रमेश धबाले आदींनीही आपली मते मांडली. बैठकीत सुरू असलेल्या मतदार यादी प्रक्रियेबाबत तसेच आगामी तालुका पंचायत, जिल्हा पंचायत व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, संजीव पाटील, अमृत शेलार, जयसिंगराव पाटील, मुकुंद पाटील, बाळासाहेब शेलार, बी. जी. पाटील, भैरू पाटील, पुंडलिक पाटील, सातेरी पाटील, डी. एम. भोसले, संदेश कोडचवाडकर, राजाराम देसाई, राजेंद्र कुलूम, अजित पाटील, नागोजी पाटील, शिवाजी पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *