Sunday , September 20 2026
Breaking News

केसरेकर कुटुंबीयांच्या न्याय लढ्याला आता कायदेशीर बळ

Spread the love

 

खानापूर एकीकरण समितीच्या पाठपुराव्याची दखल; वरिष्ठ विधिज्ञ जे. व्ही. नवले यांची नियुक्ती

सांगली : कुपवाड येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेत सौ. मनीषा केसरेकर आणि श्री. मोहन नागप्पा केसरेकर यांचा मृत्यू झाला. या घटनेतील पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच शासनाकडून मिळणारी पीडित नुकसानभरपाई मिळवून देण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आता कायदेशीर मदतीचे बळ मिळाले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केसरेकर कुटुंबीयांसाठी वरिष्ठ विधिज्ञ जे. व्ही. नवले यांची नियुक्ती केली आहे.

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने २० ऑगस्ट रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठपुरावा करून केसरेकर कुटुंबीयांना मोफत कायदेशीर मदत आणि नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत प्राधिकरणाने विधिज्ञ नवले यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे.

नियुक्त विधिज्ञांकडून केसरेकर कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळविण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया, कागदपत्रांची पूर्तता आणि संबंधित शासकीय यंत्रणांकडे करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार मोफत कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी ३ सप्टेंबर रोजी यासंदर्भात अधिकृत पत्र जारी केले. संबंधित पीडितांच्या वारसांनी नियुक्त विधिज्ञांशी संपर्क साधून घटनेशी संबंधित आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या निर्णयाची माहिती महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनाही देण्यात आली आहे. तसेच खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून आणि वैयक्तिक पत्राद्वारे या कार्यवाहीची माहिती देण्यात आल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केसरेकर कुटुंबीयांच्या न्यायलढ्याला आता कायदेशीर आधार मिळाला आहे. नुकसानभरपाई मिळविण्याच्या प्रक्रियेसाठी वरिष्ठ विधिज्ञांची नियुक्ती झाल्याने कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून, पुढील कायदेशीर कार्यवाहीला वेग येण्याची अपेक्षा आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *