Friday , October 23 2026
Breaking News

सक्षम उमेदवार निवडणार; खानापूर काँग्रेसची निवडणूकपूर्व तयारी बैठकीत निर्णय

Spread the love

डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवाहन; उमेदवार निवडीसाठी छाननी समिती स्थापन करणार

खानापूर : जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खानापूर काँग्रेसतर्फे मंगळवारी रायगड निवास येथे निवडणूकपूर्व तयारी बैठक उत्साहात पार पडली. खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आतापासूनच निवडणुकीच्या कामाला लागावे, असे आवाहन केले. निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

या बैठकीला बेळगाव जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष बसवराज सिग्गावी उपस्थित होते. जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. निंबाळकर यांची भेट घेऊन त्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे बसवराज सिग्गावी यांचाही सत्कार करण्यात आला. बैठकीत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीसंदर्भात आपली मते मांडून विविध सूचना केल्या.

उमेदवार निवडीसाठी छाननी समिती

निवडणुकीसाठी तालुका स्तरावर छाननी समिती स्थापन करण्यात येणार आहे. इच्छुकांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांची समितीमार्फत छाननी करून योग्य उमेदवारांची निवड केली जाईल. खानापूर तालुक्यात काँग्रेसतर्फे सक्षम आणि निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना संधी दिली जाईल, असे डॉ. निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी तालुक्यातील काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली असून, योग्य वेळी त्यांचे पक्षात स्वागत करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

राजकारणात महिलांच्या सहभागाला प्राधान्य

यंदा महिलांना मोठ्या प्रमाणावर आरक्षण मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत डॉ. निंबाळकर यांनी राजकारणातील महिलांचा सहभाग आणखी वाढण्याची गरज असल्याचे मत मांडले. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सावित्री मादार यांनीही महिला आरक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले.

बैठकीला अॅड. घाडी, महांतेश राऊत, लक्ष्मण मादार, रियाज पटेल, बेनी पिंटो, काशिम हत्तिहोळी, बसप्पा बसट्टी, रमेशगौडा पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खानापूरमध्ये उद्या काँग्रेसचे आंदोलन

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात खानापूर काँग्रेसतर्फे बुधवारी, १४ ऑक्टोबर रोजी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

सकाळी ९.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या आंदोलनात काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर समिती लढवणार जि. पं. व ता. पं. निवडणुका

Spread the love  जागृतीसाठी विभागवार बैठका घेणार १ नोव्हेंबर गांभीर्याने पाळण्याचे आवाहन खानापूर : जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *