Friday , October 23 2026
Breaking News

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची १५ ऑक्टोबरला महत्त्वाची बैठक

Spread the love

 

जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुकांची रणनीती आणि १ नोव्हेंबरच्या काळादिन आंदोलनावर होणार चर्चा

खानापूर : आगामी जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकांसह १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळादिन आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

खानापूर येथील राजा शिवछत्रपती स्मारक येथे सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांचे हक्क आणि सीमाचळवळीच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

बैठकीत आगामी जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकांसाठी समितीची रणनीती ठरविण्यासह उमेदवारी आणि निवडणुकीच्या नियोजनाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच १ नोव्हेंबरच्या काळादिन आंदोलनाचे स्वरूप, नियोजन आणि पुढील कार्यक्रम यांवर विचारविनिमय करून निर्णय घेतला जाणार आहे.

सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी एकजुटीने कार्य करण्याच्या दृष्टीने बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समितीचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, कार्यकर्ते, युवा समितीचे सदस्य आणि विविध मराठी संघटनांच्या प्रतिनिधींनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील व कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई तसेच सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर समिती लढवणार जि. पं. व ता. पं. निवडणुका

Spread the love  जागृतीसाठी विभागवार बैठका घेणार १ नोव्हेंबर गांभीर्याने पाळण्याचे आवाहन खानापूर : जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *