Friday , October 23 2026
Breaking News

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी खानापूरमध्ये काँग्रेसचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

Spread the love

 

डॉ. अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

खानापूर : लोकशाही मूल्यांचे रक्षण, मतदारांच्या हक्कांचे संरक्षण आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने बुधवारी तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव तथा खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चाद्वारे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

बुधवारी सकाळी शिवस्मारक चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चापूर्वी जांबोटी क्रॉस येथील बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला आणि शिवस्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

त्यानंतर आंदोलक राजा शिवछत्रपती चौकात दाखल झाले. येथे मानवी साखळी तयार करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. ‘व्होट चोर, गद्दी चोर’, ‘ज्ञानेश कुमार हटाव, चुनाव आयोग बचाव’ यांसह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यानंतर मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता, मतदारांच्या हक्कांचे संरक्षण आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसंदर्भातील मागण्यांचे निवेदन तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांना सादर करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. अंजली निंबाळकर यांनी देशभरात संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी ‘संविधान बचाव’ आंदोलन सुरू असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इशाऱ्यावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया रद्द करावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी, महांतेश राऊत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंबान्ना होसमणी आणि प्रमोद सुतार यांनीही निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

मोर्चात काँग्रेसचे माजी अध्यक्ष महादेव कोळी, पंचहमी योजनांचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी, महिला काँग्रेसच्या नेत्या सावित्री मादार, दीपा पाटील, सौ. दंडगल, संदीप देसाई, संतोष हंजी, राजू हंजी, गुड्डू टेकडी, तोहीद चांदकन्नावर, ईश्वर बोबाटे यांच्यासह तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर समिती लढवणार जि. पं. व ता. पं. निवडणुका

Spread the love  जागृतीसाठी विभागवार बैठका घेणार १ नोव्हेंबर गांभीर्याने पाळण्याचे आवाहन खानापूर : जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *