कोल्हापूर : कर्नाटक सरकारचा अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी अट्टाहास कायम आहे. या संदर्भात कायदेशीर हालचाली करण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सुद्धा इशारा दिला आहे. जर कर्नाटक सरकार वकील आणि जलतज्ज्ञांची फौज उभा करत असेल, तर आम्ही देखील त्या विरोधात तशीच वकिलांची आणि जलतज्ञांची फौज उभा करू, असा इशारा दिला आहे. अलमट्टीमधील पाणी विसर्गाबाबत सध्या दोन्ही पातळ्यांवर चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले.
प्रकाश आबिटकर म्हणाले की, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला महाराष्ट्र सरकारचा विरोध असल्याचे केंद्राकडे स्पष्टपणे सांगितलं आहे. अलमट्टीमुळे सांगली आणि कोल्हापूरला सर्वाधिक फटका बसणार असल्याचे ते म्हणाले. धरणाची उंची वाढवण्यासाठी जर कर्नाटक सरकार अशा पद्धतीने वकील आणि जलतज्ज्ञांची फौज उभा करत असेल, तर आम्ही देखील त्या विरोधात तशीच वकिलांची आणि जलतज्ञांची फौज उभा करू असे ते म्हणाले. कायदेशीरदृष्ट्या जे जे करावे लागेल ते आम्ही करु, असे त्यांनी नमूद केले.
महापुराचा फटका बसू नये याची काळजी घेत आहोत
आबिटकर यांनी सांगितले की, या दरवर्षीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. पुढील आठ दिवसात कृषी विभाग आणि महापूर नियंत्रणा संदर्भात देखील बैठका होतील. महापूर रोखण्यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्या केल्या जातील. महापूर येऊ नये यासाठी दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, कोल्हापूर आणि सांगलीचे आम्ही पालकमंत्री समन्वय ठेऊन काम करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.