Wednesday , April 22 2026
Breaking News

शिवसेनेच्या आमदार अपात्रताप्रकरणी आजपासून सुनावणी

Spread the love

 

दोन्ही गटांचे आमदार सुनावणीला उपस्थित राहणार, ठाकरे गट वकीलांमार्फत भूमिका मांडणार

मुंबई : आमदार अपात्रतेच्या प्रत्यक्ष सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 40 आमदारांची आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. 14 सप्टेंबरला सुनावणीची ही प्रक्रीया पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.

शिवसेनेतल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज म्हणजेच, 14 सप्टेंबरपासून सर्व शिवसेना आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. या सुनावणीला बुधवारी दुपारी बारा वाजता सुरुवात होईल. राज्य विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी होणार आहे. एकाच दिवशी सर्व 54 आमदारांची सुनावणी होईल. या सुनावणीसाठी शिवसेनेतल्या शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना हजर राहावं लागणार आहे. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांसमोर तब्बल 34 याचिकांवर सुनावणी होईल. या सुनावणीत वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करून आपलं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येईल. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी होणार असून, संबंधित आमदारांना त्या-त्यावेळी बोलावण्यात येणार आहे.

ठाकरेंची रणनिती काय?
विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदारांच्या पात्र-अपात्रते संदर्भातील सुनावणी आजपासून सुरू होत आहे. या सुनावणीला कसं सामोरं जायचं? याचं नियोजन ठाकरे गटानं केलं आहे. ठाकरे गटाकडून त्यांचे दोन वकीलच आमदारांची बाजू अध्यक्षांसमोर मांडतील. अध्यक्षांकडून वैयक्तिकरित्या आमदारांना आपलं म्हणणं मांडा, असं सांगितलं तरच आमदार स्वतः आपली भूमिका मांडतील. आज सकाळी 11 वाजता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात ठाकरे गटाच्या आमदारांची एक बैठक होईल आणि त्यानंतर बारा वाजता ठाकरे गटाचे सर्व आमदार आणि वकील सुनावणीसाठी उपस्थित राहतील, अशी माहिती मिळत आहे.

शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरणार, सर्वोच्च न्यायालयानं निकाल लिहून दिलाय; अनिल परबांचा दावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरणार असा निकाल सुप्रीम कोर्टानं लिहून दिलाय. फक्त निकाल यायचा बाकी असल्याचा दावा ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केलाय. तसंच सरकार पडणार होतं हे भाजपला आधीच माहित असल्यानं त्यांनी राष्ट्रवादी फोडली असल्याची प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

ओम्नी प्रवासी गाडी आणि मिक्सर यांच्यात भीषण टक्कर; 11 जणांचा जागीच मृत्यू, एकाच कुटुंबातील तीन मुलीही दगावल्या!

Spread the love  मुंबई : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी सुमारे 11 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *