शिमला : हिमाचल प्रदेशमधील शिमला जिल्ह्यातील रामपूर भागातील समेज खाडमध्ये ढगफुटीमुळे मोठी दुर्घटना झाली आहे. ढगफुटीमुळे अनेक जण बेपत्ता झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम, पोलीस तसेच बचाव पथकाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले. पुरामुळे अनेक रस्ते बंद झाल्याने बचाव यंत्रणांना सर्व उपकरणांसह दोन किमीवर चालत जावे लागले. त्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. आयटीबीपी आणि विशेष होमगार्डच्या तुकडीचाही बचाव पथकात समावेश करण्यात आला असून बचाव कार्यात सर्व टीम एकत्र काम करत आहेत. रुग्णवाहिकेसह इतरही अनेक सुविधांसह बचाव कार्य सुरू आहे.
हिमालचल प्रदेशात अलर्ट
हिमाचलमधील कुल्लू जिल्ह्यातही ढगफुटीमुळे पूर आला होता. या पुरात एका पूलासह तीन ते चार दुकाने वाहून गेली होती. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत हिमाचल प्रदेशात मान्सूनच्या हालचालींची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील चार ते पाच दिवस वादळ किंवा विजांच्या कडकडाटासह तीव्र ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.