पणजी (वार्ता) : गोव्यात काँग्रेसबरोबर निवडणूकपूर्व युती झाली नसली तरी निवडणुकीनंतर शिवसेनेला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला जरी यश मिळाल्यास त्यांच्याबरोबर आघाडी ही कायम राहील, असे स्पष्टीकरण शिवसेना खासदार व गोव्याचे निवडणूक प्रभारी संजय राऊत यांनी काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी आघाडीविषयी दिल्लीत केलेल्या वक्तव्यावर बोलताना सांगितले.
महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीची काँग्रेसबरोबर आघाडी झाली नाही. परंतु निवडणुकीनंतर संधी मिळाल्यास दोन्ही पक्षांसोबत काम करण्याचा काँग्रेस नक्कीच प्रयत्न करेल, असे मत काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले होते. खासदार राऊत याविषयी म्हणाले की, महाराष्ट्रात निवडणुकीनंतरच आघाडी झाली होती. त्याप्रमाणे गोव्यातही होऊ शकते. ती शक्यता नाकारता येणार नाही.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विविध पक्षांच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सहभागाने राजकारणाला रंग भरला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी घरोघरी जाऊन प्रचार केला. दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी न होऊ शकल्याच्या मुद्द्यावर वरील वक्तव्य केले आहे.
मुख्य लढत ही काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युती आणि सत्ताधारी भाजपमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. आता शिवसेनेचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे येत्या पाच व सहा फेब्रुवारीला गोव्यातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार आहेत.