गाझा शहरात इस्राइलचा नरसंहार अद्याप सुरूच आहे. जगभरातून टीका होत असूनही, नेतन्याहू आणि त्यांच्या सैन्याने गाझा आणि रफाहवर त्यांचे हल्ले सुरूच ठेवले आहेत. यावेळी इस्रायली लष्कराने मध्य गाझा पट्टीतील नुसरत कॅम्पमध्ये राहणाऱ्या निरपराध लोकांना लक्ष्य करत हवाई हल्ले केले. शाळेवर झालेल्या हल्ल्यात किमान 30 पॅलेस्टिनी नागरीक ठार झाले आहेत. तर, अनेक जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे.
आज (गुरुवारी) सकाळी, चीनची वृत्तसंस्था शिन्हुआने गाझा येथील रुग्णालयातील अधिकाऱ्यांचा हवाला देत सांगितले की, इस्रायली लढाऊ विमानाने किमान तीन शाळेच्या वर्गांवर बॉम्बहल्ले केले त्यामध्ये अनेक लोक मारले गेले आहेत. इस्राइलचे हल्ले मध्य गाझा येथील एका शाळेवर झाले. या शाळेत शेकडो पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला आहे.
हमास संचालित गाझा सरकारच्या मीडिया कार्यालयाने एका निवेदनात शाळेवरील इस्रायली हल्ल्याचा निषेध केला आणि त्याला “भयानक नरसंहार ” म्हटले आहे. इस्रायली सैन्याने हे हल्ले चालू ठेवणे हा नरसंहाराच्या गुन्ह्याचा स्पष्ट पुरावा आहे. मानवतेला धोका निर्माण करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या गुन्ह्यांची संपूर्ण जबाबदारी इस्राइल आणि अमेरिकेने घेतली पाहिजे, असे कार्यालयाने म्हटले आहे. या घटनेवर इस्रायली बाजूने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.