डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या 22 जणांसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. अचानकपणे खराब वातावरणात रस्ता चुकल्यामुळे 9 ट्रेकर्सचा मृत्यू झाला आहे. उर्वरित १३ ट्रेकर्सचा शोध चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत ट्रेकर्समध्ये पुण्यातील एका तरुणाचा समावेश आहे. तर उर्वरित ट्रेकर्स हे कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथील आहेत. उर्वरित ट्रेकर्सचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकमधील 18, महाराष्ट्रातील एक तसेच तीन स्थानिक मार्गदर्शक अशा एकूण 22 जणांचा चमू मल्ला-सिल्ला-कुष्कल्याण-सहस्त्रताल या ठिकाणी ट्रेकिंगसाठी निघाली होती.आपली ट्रेकिंग पूर्ण करून ही टीम 7 जूनपर्यंत परतणे अपेक्षित होते. समोवारी (3 जून) ही टीम शेवटच्या शिबिरातून सहस्त्रतालकडे निघाले होते. मात्र अचानकपणे तेथिल हवामान खराब झाले आणि या टीमचा रस्ता चुकला. परिणामी ही संपूर्ण टीम भरकटली. यात आतापर्यंत 9 ट्रेकर्सचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये पुण्याच्या तरुणाचा समावेश आहे. उर्वरित मृत हे बंगळुरूचे आहेत. उर्वरित 13 ट्रेकर्सचा शोध घेणे चालू आहे. भारतीय नौसेना, एसडीआरएफच्या जवानांना हेलिकॉप्टरच्या मदतीने पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.
ट्रेकर्सना शोधण्यासाठी विशेष मोहीम
दरम्यान, या ट्रेकर्सचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. उत्तरकाशी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. उत्तरकाशी आणि टिहरी गढवाल पोलीस विभाग, नेहरू पर्वतारोहण संस्था आणि आयटीबीपीच्या अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केल्यानंतर, जिल्हा दंडाधिकारी यांनी घोषित केले की शोधमोहिमेसाठी एक संयुक्त टीम तयार केली जाईल. पोलीस, एसडीआरएफ कर्मचारी आणि ट्रेक मार्गाशी परिचित असलेल्या स्थानिक मार्गदर्शकांसह खराब परिस्थितीत अडकलेल्या ट्रेकर्सचा शोध घेतला जात आहे.