कोगनोळी : हंचिनाळ येथील पाटील मळ्यातील शेतात उसाचा पाला काढत असताना सापाने पायाला दंश केल्यामुळे सौ रुपाली अमृत ढाले (वय 32) यांचे शुक्रवारी कोल्हापुरात खाजगी रुग्णालयात निधन झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार
सौ रुपाली ढाले या रोजंदारी करून आपला उदरनिर्वाह चालवत होत्या. नेहमीप्रमाणे येथील गावालगत असलेल्या पाटील मळ्यात श्री. दादासो पाटील यांच्या शेतात उसाचा पाला (खुरपंन) काढत असताना कीचकाटात फरोड जातीच्या सापाने रूपालीच्या पायाला दंश केला. तिच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा केला. तिच्या सोबत असलेल्या महिलांनी तिच्या जवळ जाऊन पाहिले असता साप किचकाटात निघून गेला. पहिल्यांदा तिला बेनाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथील केंद्रात व्यवस्था नसल्याचे सांगितल्यामुळे निपाणी गांधी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून तिला कोल्हापूरला सीपीआर दवाखान्यात नेण्यात आले. परंतु तेथे कोरोना पेशंटच्या गर्दीमुळे त्यांची दखल न घेतल्यामुळे अखेर तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर 19 दिवस उपचार सुरू होते. सर्पदंशामुळे किडन्या निकामी झाल्यामुळे अखेर शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मावळली.
आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे रोजंदारी करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या कुटुंबावर मोठा आर्थिक खर्च होऊनही रुग्ण दगावला मुळे मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
त्यांच्या पश्चात पती, एक 14 वर्षांचा लहान मुलगा, एक मुलगी, सासू, दीर, जाऊ असा परिवार आहे.
शांत मनमिळावू प्रेमळ महिलेचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
