Sunday , July 26 2026
Breaking News

स्वाभिमानीने अडवली उसाची वाहने

Spread the love

 

निपाणी येथे आंदोलन; निर्णयाच्या आश्वासनाने आंदोलन मागे

निपाणी (वार्ता) : गतवर्षीच्या हंगामातील प्रतिटन ४०० रुपये देण्यासह यंदाच्या हंगामात ३५०० रुपयांची एफ आर पी जाहीर करूनच उसाचा हंगाम सुरू करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. पण निपाणी शिवाय भागातील काही साखर कारखान्यांनी दर जाहीर न करताच यंदाचा हंगाम सुरू केला आहे. त्यामुळे आक्रमक बनलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी व प्रा. एन. आय. खोत यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता.२) दुपारी निपाणीजवळ ऊस वाहतुकीची वाहने अडवून आंदोलन केले. त्यामुळे येथील महामार्गा जवळील आंदोलन नगर रस्त्यावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनासह इतर शेतकरी संघटनांनी यंदाच्या हंगामातील उसाचा दर जाहीर करूनच कारखाने सुरू करावेत. याशिवाय गट हंगामातील ऊसाला प्रति टन ४०० रुपयांचा हप्ता द्यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने गतहंगामातील ४०० रुपये देण्यासह यंदाच्या हंगामातील ऊस दर जाहीर करूनच कारखाने सुरू करावेत असा आदेश बजावला आहे. तरीही सेवा भागातील अनेक कारखान्यांनी आपला गळीत हंगाम चालू ठेवला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी गळतगा, बेडकीहाळ आणि परिसरात ऊस वाहतुकीची वाहने रोखली होती. त्यानंतर आता निपाणीत गुरुवारी ऊस भरणारी वाहने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरली.
काही वेळातच हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक रामगोंडा पाटील यांनी प्रा. यांच्याशी संपर्क साधून दोन दिवसात यंदाच्या हंगामातील दर जाहीर करण्यासह मागील ४०० रुपयाबाबत निर्णय घेऊन शेतकऱ्यांना कळविण्यात येणार आहे. याशिवाय आठवडाभर कारखाना बंद ठेवणार असल्याचे सांगितल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन मागे घेतले.
यावेळी तात्यासाहेब पाटील, सचिन पाटील, अजित पाटील, जयराम मिरजकर, बाबासाहेब मगदूम, सुधाकर माने, आनंद आंबेकर, धनाजी कांबळे, संजय कांबळे, नेताजी कोळी, अनिल कापसे, बाळकृष्ण बिडकीहाळे, शकुंतला तेली, पल्लवी बिडकीहाळे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *