निपाणी : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी व जागृतीसाठी २५ फेब्रुवारीला येथील नरवीर तानाजी चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्धार येथील महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना व मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी घेतला. येथील मराठा मंडळ संस्कृतिक भवनात आज महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना व मराठी भाषिक कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीत विविध महत्त्वाचे ठराव करण्यात आले. विशेष म्हणजे दिल्ली येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन २१ पासून होत असून साहित्य संमेलनात सीमाप्रश्नी ठराव करण्याची मागणी अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्याकडे केली असून त्यांनी त्याला होकार दिला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे निपाणी अध्यक्ष जयराम मिरजकर म्हणाले, ‘बैठकीच्या निमित्ताने सीमाप्रश्नी चार ठराव केले आहेत. महाराष्ट्र शासनाने आगामी विधानसभा अधिवेशनात सर्व पक्षांनी मिळून सीमाप्रश्नी ठराव करून केंद्राकडे पाठपुरावा करावा, ज्येष्ठ विधिज्ञ हरीष साळवे महाराष्ट्राची सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार असून महाराष्ट्र शासनाने त्यांना पूर्ण सहकार्य करावे, सीमाप्रश्नी चर्चेसाठी पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीसह सीमावासीयांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करावी, चर्चेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची तारीख व वेळ निश्चित करून घ्यावी अशा ठरावांचा त्यात समावेश आहे.’
यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाबासाहेब खांबे आदींनी विचार व्यक्त करून सीमाप्रश्नी लढण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. यावेळी लक्ष्मीकांत पाटील, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, राजेंद्र चव्हाण, तुकाराम कोळी, अशोक खांडेकर, संतराम जगदाळे, प्रताप पाटील, रमेश निकम, आनंदा बेलवळे, विनायक साळवे, विजय पाटील, सौरभ बेलवळे, रमेश कुंभार, आनंदा रणदिवे, दिलीप जाधव, गणेश घोडके, विशाल घोडके, अतुल शिंदे, प्रकाश रावण, शिवाजी पाटील, विशाल पाटील, धनाजी निर्मळे, सुधाकर माने, उदय शिंदे, कबीर वराळे आदी उपस्थित होते.